खा.रक्षा खडसेंचा भाजपच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख? गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

0

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल भाजपच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. पण काही वेळानंतर हा आक्षेपार्ह उल्लेख काढून टाकून चूक दुरुस्त करण्यात आल्याचे दिसून आले.

भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर भाजप खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. ही बाब पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विट करत निदर्शनास आणून दिली. याची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली. ”भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. @BJP4India आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा @MahaCyber1 पुढील कारवाई करेल,” असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत दिला.

भाजपची वेबसाइट कोण चालवतं आहेत? असा सवाल करत चतुर्वेदी यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट केला. त्यांनी याबाबतचे ट्विट गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना टॅग केले आहे. या ट्विटची गंभीर दखत घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, भाषांतराच्या घोळामुळे हा प्रकार घडला असल्याचे दिसत आहे. या प्रकारावर खासदार रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.