खास मुहूर्तावर मोदी भरणार अर्ज ; मित्रपक्षांचे नेते राहणार उपस्थित

0

वाराणसी – १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार) उत्तरप्रदेशच्या वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, ज्योतिषांचा सल्ला मानत आज मोदी अभिजीत मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी काशीचा कोतवाल म्हणून प्रसिद्ध असेलले दंडाचे अधिकारी आणि कल्याण करणारे बाबा म्हणून मान्यता असलेल्या बाबा कालभैरवाचे दर्शन करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे भाजपच्या मित्रपक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदी गुरूवारी वाराणसीत दाखल झाले. त्यानंतर सुमारे सात किलोमीटर चाललेल्या रोड शोच्या माध्यमातून त्यांनी शक्तिप्रदर्शन घडवले. त्यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मागील वेळी मोदींनी वाराणसीबरोबरच गुजरातमधूनही लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी ते एकाच मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहून विविध पक्षांचे नेते भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या ऐक्‍याचे दर्शन घडवणार आहेत. तामीळनाडूत सत्तेवर असणाऱ्या अण्णाद्रमुकचे नेतेही त्यावेळी उपस्थित असतील. याआधी भाजपचे अध्यक्ष अमित शहा गुजरातच्या गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवत असून उमेदवारी अर्ज दाखल करताना उद्धव आणि एनडीएच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.