खामगाव (प्रतिनिधीं) – नगर परिषदेमध्ये सर्व सामान्य जनतेला न्याय मिळणे दुरापस्त झाले आहे, त्यांची दिशाभूल करून बोळवण केल्या जाते. मात्र काळेबेरे धंदे करणार्यांना न.प. कडून अभय देण्यात येते. हे काही दिवसापूर्वी न. प. बांधकाम विभागात अधिकारी व कर्मचारी यांच्या अनुपस्थितीत ठेकेदार संगणक हाताळतांना केलेल्या स्टींग ऑपरेशनवरून सिध्द झाले आहे. आज 19 मार्च रोजी तर न.प. मध्ये साहेब हजर असताना ठेकेदारांची भाऊगर्दी झाली होती. त्यामध्ये अनेकांचे चांगभले होऊन साहेबांचीही चांदी झाल्याचे बोलले जात आहे.
खामगाव न.प. ला मुख्याधिकारी अकोटकर रूजू झाल्यामुळे न.प.ला चांगले दिवस येतील व कारभार सुरळीत होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळेल असे वाटत होते. पण कशाचे काय साहेब मागील खरकटे साफ करून खुरचन जमा करण्यात व्यस्त असल्याचे न.प. वर्तुळात बोलले जात आहे. आज 19 मार्च रोजी काही सर्व सामान्य नागरिक कामानिमित्त नगर परिषद मध्ये आले होते. कारण बहुधा साहेबही हजर होते. पण न.प.मध्ये ठेकेदारांची वर्दळ दिसून येत होती. तर कामाच्या रकमेपोटी प्रलंबित चेक हातोहात मिळाल्याने काहींच्या चेहर्यांवर आनंद ओसंडून वाहत होता. बरे झाले साहेबांमुळे मागचे खरकटे निघून जात आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया उमटत होत्या.
बाश्या कढीला ऊत देण्याचा प्रकार…
मिळालेल्या माहितीनुसार न.प. मध्ये ठेकेदारांची चंगळ होत असल्याचे पाहून प्रभाग क्र. 11 मध्ये गोपाळनगर भागात नियमबाह्य नाली बांधकाम करणार्या ठेकेदाराने सुध्दा या लगीन घाईत तक्रारीमुळे आपले प्रलंबित बिल काढण्याचा प्रकार चालविला होता. त्यासाठी काहींना हाताशीही धरले होते. कदाचित साहेबांना माहित नसावे हे प्रकरण मागील 4-5 वर्षापासून सुरू आहे. या कामाची शासकीय तंत्र निकेतनच्या क्वालिटी कंट्रोल च्या माध्यमातून ऑगस्ट 2020 मध्ये चौकशी झाली आहे. त्यावर तक्रारकर्त्याने शंका व्यक्त करून आक्षेपही घेतला आहे. यावर वरिष्ठांचा अभिप्राय अद्याप बाकी आहे. तरी सुध्दा संबंधित ठेकेदार सदर बिल काढण्यासाठी धडपडत होता. आज अशाप्रकारे काही बोगस कामांची बिले निघाली असतील तर मुख्याधिकारी अकोटकर यांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे न.प. वर्तुुळात बोलले जात आहे.