खामगाव(गणेश भेरडे):- न.प. बांधकाम विभाग व ठेकेदाराचे संगनमत असल्याने स्थानिक गोपाळनगर भागातील प्रभाग क्र. 11 मधील नियमबाह्य नाली बांधकाम प्रकरणी कारवाई सुमारे 2 वर्षापासून गुलदस्त्यात असून संबंधितांकडून न.प. व जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून ठेकेदाराला अभय देण्यासोबतच त्याचे रखडलेले बिल कसे काढता येईल. यावरच जास्त भर देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
गोपाळनगर भागात सन 2019 मध्ये गोविंदा डाहे ते सार्वजनिक शौचालय पर्यंत नाली बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कार्यादेश न.प. कडून देण्यात आला होता. मात्र संबंधित ठेकेदाराने न.प.च्या ठरावानुसार व कार्यादेश नुसार पेव्हर ब्लॉक तर बसविलेच नाही. उलट जुन्या नालीवरच मुलामा चढवुन नवीन बांधकाम केल्याचे दाखविले आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर न.प. ने शासकीय तंत्र निकेतनच्या माध्यमातून बांधकामाची गुणवत्ता तपासणी केली. मात्र सदर तपासणी मॅनेज असल्याची शंका आल्यावरून याबाबत तक्रारकर्त्याने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. तर जिल्हा प्रशासनाने सुध्दा याप्रकरणी चौकशी करून उचित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याबाबत चौकशी करून कारवाई करण्याऐवजी आतापर्यंत केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत असून संबंधित ठेकेदाराचे रखडलेले बिल कसे काढता येईल यासाठी न.प. बांधकाम विभाग अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून न.प. व जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याचे दिसून येते.
मुख्याधिकारी तसे चांगले…पण ठेकेदारांच्या नादी लागले…
खामगाव न.प. मुख्याधिकारी मनोहरराव अकोटकर हे कर्तव्यनिष्ठेबाबत तसे चांगले आहेत परंतु ठेकेदारांच्या नादी लागल्याने वांगले असल्याची चर्चा न.प. वर्तुळात होत आहे. कारण ठेकेदारांनी शहराच्या विकासाचे वाटोळे करणे सुरू केले आहे. हे सर्वश्रृत आहे. मात्र ठेकेदाराच्या एका दलालाने मुख्याधिकारी यांना चांगलेच घेर्यात घेतले असून बांधकाम विभाग पदाधिकारी व अधिकार्यांच्या संगनमताने विवादित ठेकेदाराचे बिल काढण्याबाबत प्रयत्न सुरू केले आहे. उपरोक्त प्रकरणातील तक्रारकर्त्याने नुकतीच मुख्याधिकारी अकोटकर यांची भेट घेऊन प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी त्यांनी नगर अभियंता जोशी यांना बोलावून सदर नियमबाह्य नाली बांधकाम तक्रारीबाबत विचारणा केली असता जोशी यांनी तक्रारीत तथ्य असल्याचे सांगून साहेब परत एकदा स्थळ निरीक्षण करावे लागेल असे तोंडी सांगून मल्लिनाथी मारली. असा अनुभव तक्रारकर्त्याला आला आहे. ठेकेदाराला अभय देणारे हेच अधिकारी मुख्याधिकारी यांना परत चौकशी करण्याचा सल्ला देतात याला काय म्हणावे, याबाबत मुख्याधिकारी यांनीच विचार करावा.

