खामगाव(प्रतिनिधी) : न.प. मधील विरोधक असलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी शहरातील रस्ते बांधकामा बाबत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकतीच केली आहे. मात्र न.प. व जिल्हा प्रशासन खामगाव न.प. संदर्भातील तक्रारीला काहीच भाव देत नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.
कारण काही दिवसापूर्वी दैनिक लोकशाही ने स्टींग ऑपरेशन करून न.प. बांधकाम विभागाचा कारभार ठेकेदारच सांभाळत असल्याची बाब चव्हाट्यावर आणली आहे. सदरचे वृत्त प्रसार माध्यमांनी उचलून धरल्यामुळे न.प. ची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली होती. परंतु याच स्टींग ऑपरेशन मधील अदाणी-मदाणी- भैय्या- सैय्या अशा ठेकेदारांविरूध्द अद्यापही कारवाई झाली नसल्याचे दिसून येते. तर साहेबही संबंधित दलाल ठेकेदार असल्याशिवाय कोणाचेही बिल काढत नाही. याबाबत सर्वकाही सर्वश्रृत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाचा सांभाळ करणारे ठेकेदार आपल्याच नावाने ठेके काढावे अशी गळ नगरसेवकांना घालत असल्याची ओरड काही नगरसेवकांनी केली आहे. तर या ठेकेदारांमुळेच शहराचे जुने वैभव असलेल्या नटराज गार्डनच्या सुशोभिकरणाचे काम रखडल्याची प्रतिक्रिया न.प. वर्तुळात व्यक्त होत आहे.
शहरातील बहुतांश चांगल्या स्थितीत असलेले सिमेंट रस्ते उखडून डांबरीकरण करण्यात आले आहे. तर कोट्यवधी रूपये खर्चुन डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर अल्पावधीतच खड्डे पडल्याने पॅच मारण्याचे काम निकृष्ट करण्यात आले आहे. याबाबत काँग्रेस नगरसेवकांनी न.प. मध्ये रस्ताकामात मोठ्या भ्रष्टाचार झाला असून याप्रकरणी चौकशी करून संबंधित ठेकेदारांविरूध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे. न.प.चे सत्ताधारी नगरसेवकच ठेकेदार झाले असल्याचा आरोप सुध्दा काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीवर कारवाई होईल की नाही याबाबत साशंकता आहे. कारण न.प. बांधकाम विभागाच्या गैरव्यवहाराचे कित्येक किस्से आतापर्यंत चव्हाट्यावर आले आहे. पण कारवाई करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून न.प. चा कारभार सांभाळणारे दलाल नगरसेवकांना आपल्याच नावाने ठेका घेण्याची गळ घालत असल्याच्या तक्रारीला दुजोरा मिळत आहे. खरे खोटे मुख्याधिकारीच जाणो.