खामगाव (गणेश भेरडे)- गैरकारभाराची एक ना अनेक प्रकरणे समोर येत असल्याने नगर परिषदेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. त्यातच बांधकाम विभागाबाबत तर काही बोलायलाच नको, आणि आता याच विभागाचा कारभार चक्क ठेकेदार सांभाळत असल्याची बाब स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आली आहे. तर याबाबत मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याकडून सारवासारव केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे न.प. च्या एकुणच कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या अनुषंगाने केल्यास गैर ठरणार नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार दि. 1 मार्च रोजी दुपारी 1.30 ते 2 वाजताच्या दरम्यान न. प. बांधकाम विभागात दोन व्यक्ति संगणक(कॉम्प्युटर) हाताळतांना दिसले. त्यांना विचारणा केली असता ते ठेकेदार असल्याचे समजले. मात्र कुणीही अधिकारी वा कर्मचारी तेथे उपस्थित नव्हते. यावेळी स्टींग ऑपरेशन सुरू केले असता एकाने अमिष दाखवून या प्रकाराचा बोभाटा न करण्याचा अर्थपूर्ण सल्ला दिला. मात्र नेमका प्रकार काय, हे जाणून घेण्यासाठी बांधकाम विभागाचे तांत्रिक सहायक रवि पारसकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना कल्पना दिली असता ते म्हणाले की, सध्या मी साईटवर आहे.. माझ्याच्याने फाईल डिलिट झाली होती म्हणून डाटा कव्हर करण्यासाठी त्यांना संगणक हाताळण्यास सांगितले आहे, बाकी काही नाही.. यावर पारसकर यांना नगर परिषदेचे कॉम्प्युटर इंजिनियर नाहीत काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी तुम्ही नंतर ऑफीसमध्ये या.. या विषयावर बोलू , मोबाईलवर बोलता येणार नाही, असे म्हणून संभाषणास अर्थपूर्ण पूर्णविराम दिला. त्यामुळे मुख्याधिकारी अकोटकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून उपरोक्त प्रकाराची माहिती दिली असता, ते म्हणाले की.. सध्या मी कोर्टाच्या कामानिमित्त अकोट येथे आलो आहे, असे सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
मिळालेल्या माहितीनुसार न.प. बांधकाम विभागात ठेकेदारच मनमानेल बांधकामाचे ईस्टिमेट तयार करतात. तर अधिकारी फक्त कागदापत्रांवर सही करून सह्याजीरावाची भूमिका बजावतात. बांधकाम विभागात अनेक घोळ झालेले आहेत. त्यामध्ये बोगस व अनियमित बांधकाम, न.प. मालकीच्या जागांचे हस्तांतरण, अतिक्रमण असे एक ना अनेक गैरप्रकाराचे किस्से आहेत. सध्या नटराज गार्डन सौंदर्यीकरण कामादरम्यान करण्यात येत असलेले बांधकाम संशयाच्या भोवर्यात अडकल्याने सदरचा वाद जिल्हादंडाधिकारी बुलडाणा यांच्याकडे न्यायप्रविष्ठ असल्याचे समजते. तसेही न.प. अधिकारी वा पदाधिकारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाला जुमानत नसून केराची टोपली दाखवितात, हे वरील प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तक्रारीवर त्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशावरून दिसून येते. त्यामुळे या प्रकरणी काही कारवाई होईल की नाही याबाबत सांशकताच आहे, पण जिल्हा प्रशासनाने न.प. मध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याइतपत तरी कर्तव्यदक्षता दाखवावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेने करणे गैर नाही.
विशेष बाब म्हणजे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले मुख्याधिकारी मनोहरराव अकोटकार हे येथे नुकतेच रूजू झालेले आहे. त्यांना न.प.च्या (गैर) कारभाराची माहिती होण्यापूर्वीच मागील मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळात झालेली अशी काही प्रकरणे त्यांच्याकडून निस्तारण्याचा प्रयत्न अधिकार्यांकडून होत असावा, म्हणूनच ते वारंवार रजेवर जात आहे तसेच कोणत्याही प्रकरणात प्रतिक्रिया देण्यास टाळत आहे, अशी चर्चाही न.प. वर्तुळात होत आहे.