खामगाव (प्रतिनिधी)- अलिकडच्या काळात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणूक करुन जास्त नफा कमाविण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशा धंद्याकडे तरूणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले होते.
त्यामुळे शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे पोलिसांनी जणूकाही अवैध धंद्यांना एनओसी दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात होता. याविरूध्द काही पत्रकारांनी आवाज उठविताच शहरात शनिवारपासून वरली मटक्याला तुर्त ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. मात्र काहींच्या मते कोणीतरी लेटर बॉम्ब टाकल्याने हे सर्वकाही घडले असल्याचे सांगण्यात येत आहे तर पोलिस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी व मिडियातील त्यांचे काही पोटभरू प्यादे यांना हिस्सा मिळणे बंद झाल्यानेच शहरातील वरली मटका बंद झाल्याचेही बोलले जात आहे. परंतु कारण काहीही असले तरी खामगाव शहरात अशाच प्रकारे ऊतमातलेले सर्वच अवैध धंदे कायमचे बंद व्हावे अशी मागणीही शांतताप्रिय नागरिकांकडून होत आहे.
आतापर्यंत किक्रेट म्हणा या वरली मटका या सट्टा पट्टीच्या नादी लागुन कित्येक तरुण दिवसभर आकडे मोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात. शहरात कित्येक सट्टा पट्टी दलालांनी पट्टी घेण्याचे कार्यालय सरकारी जागेत अतिक्रमण करून थाटलेले होते. सध्या ते कुलूपबंद आहेत. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. तरीही या धंद्याच्या नादी लागणार्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय बंद होतात किंवा छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती जैसे थे असते. त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष
पुरवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मासिक टार्गेटसाठी चेल्याचपांट्यावर कारवाई
अवैध धंद्याबाबतची कल्पना पोलिस प्रशासनाला नसते असे नाही, पण अवैध धंद्याविरूध्द कारवाईचे मासिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी धाड टाकण्यात येते. सकाळी हप्त्याचे पैसे घेतले तरी रात्री धाड पाडून हप्तेवाईक म्हणून नविन अवैधधंदेवाईकाची स्वडायरीत अधिकृतपणे नोंद घेण्यात येते. परंतु धाडीत चेल्याचपाट्याला ताब्यात घेवून पोलिस कारवाईचा आव आणतात. त्यातून सर्वच आलबेल असल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात मात्र, पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी संबंध हे त्यांना धंदा सुरू ठेवु देण्यासाठीच असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.