खामगांव बनले अवैध गुटखा विक्रीचे प्रमुख केंद्र

0

खामगाव | प्रतिनीधी (गणेश भेरडे)

मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या व सरकारने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्रीचे खामगाव शहर जिल्ह्यात मोठे केंद्र बनले आहे. किती कारवाया केल्यातरी गुटखा माफियांना काही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. कारण अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिसांच्या पाठबळावर खुलेआम बेकायदेशीरपणे गुटखा विक्री सुरु असून येथून जिल्ह्यातही  गुटखा पुरवठा केला जातो. मात्र गुटखा तस्करी रोखण्यात संबंधित यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने हा अवैधधंदा बेधडकपणे सुरु आहे. विशेष म्हणजे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यातच हा गोरखधंदा सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात अलिकडेच एमआयडीसी भागातील एका गोडावूनमधून व नुकताच शहरातील डीपी रोडवरील राधव संकुलातून लाखोचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन व पोलिस पथकाने दोनवेळा छापा टाकून लाखोचा गुटखा जप्त केल्यांनतरही  शहरात राजरोसपणे प्रतिबंधित गुटख्याची विक्री खुलेआम सुरू आहे. हे नेमके कोणाच्या आशिर्वादाने होते याची पाळेमुळे उखडण्याची गरज आहे. पण जेव्हाकेव्हा छापा मारून लाखोचा गुटखा पकडल्या जातो, तेव्हा याप्रकरणात गुन्हा दाखल होणार्‍या आरोपीचे नाव समजताच सर्व काही आलबेल होत असल्याचे दिसून येते. यामध्ये म्होरक्याला सोडून मजुर किंवा कामगाराला बळीचा बकरा बनविण्यात येतो. त्यासाठी गुटखा माफिया किंमतही मोजत असतील यात शंका नाही. कारण आरोपीची आर्थिक बाजू कमकुवत असताना त्याने लाखोचा गुटखा आणला कोठून असा प्रश्न सहज निर्माण होतो. हे सर्वकाही गुटखा माफियाला वाचविण्यासाठी केले जाते, हे नक्कीच. लाखोचा गुटखा जप्त झाल्यानंतरही शहरात गुटख्याची टंचाई निर्माण होते असे नाही, फक्त पहिलेच वाढीव दराने मिळणार्‍या गुटख्याचे दर आणखी वाढतात एवढेच. म्हणजेच शहरात कितीही छापे मारले तरी विविध ठिकाणी गुटख्याचा मुबलक साठा असल्याचे बोलले जाते.

राज्य सरकारने 2012 मध्ये गुटख्यावर बंदी घातली होती. त्यानंतरही युवापिढी तंबाखूजन्य गुटख्याचा वापर करीत आहेत. बंदीपूर्वीपेक्षाही बंदीनंतर गुटख्याची विक्री पूर्वीपेक्षा वाढली आहे. पानमसाला व तंबाखू असे दोन वेगवेगळे पाऊच (पुड्या) च्या माध्यमातून प्रतिबंधित गुटख्याची विक्री केली जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री असताना स्थानिक पोलिस प्रशासनाला त्याची कुणकुण का लागत नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातही पान टपरीतून गुटखा मिळतो. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे गुटखा माफियांची मात्र चंगळ सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे याचा पर्दाफाश होण्याची नितांत गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.