* आनंद गोरे *
जळगाव ;- येथील प्रख्यात विधीज्ञ सुशिल अत्रे यांच्या देवळे रावळे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. दैनिक लोकमतमध्ये प्रसिध्द झालेल्या देवळे – रावळे या सदरातील लेखांचे हे पुस्तकरूप होय. कान्हदेश अर्थात खान्देशच्या प्राचीन ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या जळगाव जिल्ह्यातील हिंदुच्या मंदिरांना भेट देवून त्या मंदिरांचा इतिहास जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य अत्रे यांनी केले आहे. खरेतरं लेखक सुशिल अत्रे हे पेशाने दिवाणी, फौजदारी वकिल तथापि त्यांनी आपल्यातील पर्यटन, जिज्ञासूवृत्ती असलेला अभ्यासक, इतिहासाची आवड, प्राचीन मंदिरांविषयी माहिती गोळा करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे. त्या छंदातून लिहिलेल्या देवळे-रावळे या सदरातील लेख संग्रहरुपी पुस्तक म्हणजे अनमोल खजिना म्हटला येईल.
देवळे-रावळे या पुस्तकात जळगाव जिल्हा परिसरातील एकूण 32 मंदिराचा समावेश आहे. त्यातील सर्व मंदिरांना अॅड.अत्रे यांनी प्रत्यक्ष भेटी देवून त्यांची माहिती संकलित केली आहे. स्वतः लेखक अत्रे यांनी मंदिराचे ऐतिहासिक महत्व समजून घ्यायला आपण तयारच नाही, अशी खंत सुरुवातीच्या दर्शन घेण्यापूर्वी त्या लेखात व्यक्त केली आहे. ही खंत व्यक्त करतांना त्यांनी पारोळा तालुक्यातील म्हस्वे येथील जुन्या सुर्य मंदिराचा उल्लेख केला आहे. या जुन्या प्राचीन मंदिराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जिर्णाध्दाराच्या नावाखाली प्राचीन मंदिरांची वाट लावली जात आहे. हे नमूद करतांना शेंदुर्णी येथील काशीविश्वेराच्या मंदिराचा उल्लेख केला आहे. आठ-नऊशे वर्ष जुन्या दगडी कोरीव काम असलेल्या मंदिराला जांभळा- गुलाबी ऑईलपेंन्ट फासून विद्रुप केले आहे. अशी खंत व्यक्त केली आहे.
देवळे-रावळे या पुस्तकात एकूण 32 मंदिरापैकी सुरुवातीला आधी वंदू तुज मोरया. याप्रथेप्रमाणे जळगावपासून जवळच असलेल्या तरसोदच्या गणपती मंदिराची माहिती दिली आहे. त्यानंंतर एरंडोल तालुक्यातील पद्मालय गणपती मंदिराची सचित्र माहिती गणेशभक्तांना भावणारी आहे. देवळे-रावळेतील मंदिराची माहिती देतांना ते किती वर्षाचे जुने आहेत. त्याचे असलेले सांस्कृतिक महत्व तो नवसाला पावणारा आहे का, त्याविषयी कथा – दंतकथा काय सांगते याचा सारांश रूपाने केलेला उल्लेख संग्रही ठेवावा असा आहे. प्रत्येक मंदिर तालुका स्थळापासून किती अंतरावर आहे. मंदिराची यात्रा केव्हा भरते ही सर्व माहिती तसेच मंदिराच्या दर्शनी भागाचे छायाचित्र, मंदिराच्या आतील मुर्तीचे छायाचित्र प्रत्येक लेखात दिल्याने भाविकांना हे पुस्तक वाचतांना प्रत्येक मंदिराला भेट देवून दर्शन घेतल्याचा लाभ मिळतो.
त्यासाठी भाविकांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवून वाटेल तेव्हा मंदिराचे दर्शन घेवू शकतात.
देवळे-रावळे या पुस्तकाला जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री.अशोक जैन यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेली आहे. जैन उद्योग समुहाचे संस्थापक कै.भवरलाल जैन यांनी उद्योग क्षेत्रात कमावलेल्या नावलौकीका इतकाचं विचारवंत म्हणूनही त्यांची ख्याती होती. आपल्या वडिलांचा वारसा तंतोतंत श्री अशोक जैन यांनी घेतला आहे आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. उद्योगाच्या क्षेत्रात जगात नावलौकीक निर्माण करणार्या अशोक जैन यांनी जिल्ह्यातील मंदिराना भेटी देवून त्याबाबत त्यांचा असलेला अभ्यास याप्रस्तावनेतून दिसून आली. देवळे-रावळे तील मंदिराची माहिती वाचल्यानंतर देवी-देवकांच्या मंदिराच्या स्थापनेविषयीचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्याचबरोबर यात महादेव आणि देवीची मंदिरे जास्त असल्याचा निष्कर्ष अशोक जैन यांनी काढला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेतून सुध्दा वाचकांना बरीच माहिती मिळते.देवळे-रावळेतील लेखाच्या ओघवत्या लिखाणा बरोबर अॅड.अत्रे यांचे त्यांनी कौतुक केले आहे.
एका वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या सदरातील लेखमालेचे पुस्तक आकाराला येवू शकते आणि ते आणण्याचे काम जळगावातील सुप्रसिध्द नवजीवन सुपरशॉपीचे संचालक अनिल कांकरीया यांनी केले. त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. इतकेचं नव्हे तर आपल्या सुपरशॉपीच्या माध्यमातून हे पुस्तक भाविकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे कार्यसुध्दा त्यांनी केले आहे. हे पुस्तक काढण्यासाठी नवजीवन सुपरशॉपचे कांकरीया यांचे सहकार्य मोलाचे लाभले आहे. पत्रकार दिलीप तिवारी यांनी पुस्तकाविषयी माहिती देवून लेखक अॅड.सुशिल अत्रे हे स्पटीकासमान मित्र असल्याचा उल्लेख केला आहे.
पुस्तक अंत्यत आकर्षित असून संपूर्ण पाने ग्लेझची, त्यातील संपूर्ण रंगीत छायाचित्रे, मनाला भावणारी आहेत. तथापि, दैनिकात प्रकाशित झालेल्या लेखांमध्ये पुस्तक प्रकाशित करतांना अॅड.अत्रे यांनी अधिक माहिती दिली असती तर ती भाविकांना हवीच होती. असे पुस्तक वाचतांना वाटते. तसेच पुस्तकाच्या आकर्षततेबरोबरच त्याचा आकार थोडा छोटा केला असता तर त्याला ग्रंथाचे स्वरूप आले असते, अर्थात हे माझे स्वतःचे वैयक्तिक मत आहे. देवळे-रावळे हे पुस्तक भाविकांनी विकत घेवून संग्रही ठेवावा असा हा खजिना आहे, एवढे मात्र निश्चित.