खळबळजनक ; जामनेर येथील क्वारंटाइन सेंटरमधून 15 रुग्ण पळाले

0

जामनेर : जळगाव जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना जामनेर येथील एका क्वारंटाइन सेंटरमधून 15 रुग्ण पळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांची जामनेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असूनदेखील जामनेर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मात्र कोविड सेंटरकडे दुर्लक्ष होत आहे. जामनेर पळासखेडा येथील कोविड सेंटरमधील दाखल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची हेळसांड होत असून तीन दिवसापूर्वी कोविड सेंटरमध्ये दाखल अपंग रुग्णांची देखील प्रकृती खालावली आहे. या तीन दिवसात त्यांची साधी विचारपूसही कोणत्याच डॉक्टरांनी केली नसल्याचे या रुग्णाने सांगितले. या कोविड सेंटरमध्ये सकाळ-संध्याकाळ डॉक्टर नर्स व्हिजिटला येतात, परंतु फक्त रुग्णांची हजेरी घेण्यासाठी.. रुग्णांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणारे उपकरण हे बंद स्थितीत असतानासुद्धा रुग्णांचे दैनंदिन अहवाल कागदोपत्री पूर्ण असल्याचे येथील रुग्णांच्या तोंडून समजत आहे.

त्याच बरोबर रुग्णांच्या आहाराबाबत म्हणा किंवा सेंटरमधील स्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सर्व अधिकारी कर्मचारी एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडत आहेत. त्यामुळे रूग्णांच्या गैरसोयींमुळे आणि वारंवार तक्रार करून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या संतप्त रुग्णांनी अखेर सेंटर मधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खुलेआम फिरणार का आणि फिरणार तर यामुळे जर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये सुमारे 50 रूग्ण दाखल होते, त्यापैकी पंधरा रुग्ण सुविधांच्या अभावाची कारणे देत या ठिकाणाहून फरार झाले आहेत. या फरार रुग्णांवर गुन्हा दाखल करून त्यांचा तपास पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.