विशाखापट्टणम : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोना बाधितांच्या संख्येसह मृतांचा आकडा वाढत चालला आहे. दरम्यान, या व्हायरसला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन अविश्रांत प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यशही मिळत आहे. यातच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टन महापालिकेच्या आयुक्त सृजना गुमाला यांची ही कहाणी आहे. सृजना गुमाला यांनी आपली मातृत्व हक्क रजा अर्थात 6 महिन्यांची मॅटर्निटी लिव्ह सोडून पुन्हा एकदा आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. या संदर्भातील वृत्त एका आघाडीच्या कानडी संकेतस्थळाने दिले आहे.
विशेष म्हणजे आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्या २२ दिवसांतच पुन्हा कामावर रुजू झाल्या आणि करोनाशी लढाईत सहभागी झाल्या आहेत. 2013 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकारी असलेल्या श्रीमती गुमल्ला श्रीजना या काही दिवसांपूर्वी मातृत्व हक्क रजेवर गेल्या होत्या. पण, कोरोनाचे संकट उंबऱ्यावर आल्याचे समजताच त्यांनी आपल्या महिन्याच्या तान्हुल्याला घेत थेट कार्यालय गाठले आणि झाशीच्या राणीप्रमाणे किल्ला लढवणं सुरू केलं आहे. त्यांच्या या कार्याचा सर्वत्र गौरव होत असून, अन्य महिला अधिकारी यातून प्रेरित होत आहेत..