शिवकाॅलनी रेल्वेपुलाजवळ अपघात
जळगाव – रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरून कोसळलेल्या दुचाकीस्वार तरुणाला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शिवकॉलनी रेल्वे पुलाजवळ रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. उज्ज्वल उर्फ पप्पू सोपान सोनवणे (वय २५, रा. सावखेडा बुद्रूक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
उज्ज्वल सोनवणे याच्या साडूचे वडील जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांचा जेवणाचा डबा देण्यासाठी तो रविवारी गेला होता. डबा दिल्यानंतर रात्री ९.३० वाजता तो परत घरी जात होता. शिवकॉलनीजवळ आला असता. रेल्वे पुलापासून १०० मीटर अंतरावर लोकांनी आपल्या सुविधेसाठी महामार्गावर येण्यासाठी तयार केलेल्या रस्त्यावरील खड्डा न दिसल्याने त्याची दुचाकी घसरली. त्यात ताे रस्त्यावर पडला. पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रामानंद पोलिसांनी त्याची गाडी, मोबाइल व गाडीच्या हॅण्डलला लावलेले सर्व साहित्य जप्त केले. मात्र, पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने मृताला रिक्षात टाकून जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागले. उज्ज्वल (पप्पू) याचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याची सासरवाडी रावेर येथील आहे.