खड्डा चुकविताना अभियंत्याने गमावला जीव!

0

स्कुल बसवर धडकली दुचाकी : वावडदा गावाच्या चौफुलीजवळील घटना

जळगाव, दि.30 –

तालुक्यातील वावडदा गावाच्या चौफुलीजवळ खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार अभियंता स्कुल बसवर धडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. स्कुलबसने जवळपास 10 ते 15 फुटापर्यंत मोटारसायकलस्वारास फरफटत नेले. त्यानंतर बस रस्त्याच्या खाली उतरली. या अभियंत्याच्या जवळ मिळून आलेल्या आधारकार्डवरून त्याची ओळख पटली.
धुळे जिल्हयातील कापडणे येथील मुळ रहिवाशी असलेले राजेश प्रमोद पाटील वय-34 हे टाटा इंडीकॉम कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. नोकरीनिमित्त ते जळगावातील पिंप्राळा परिसरात स्थायिक झाले होते.
खड्डा चुकविताना झाला अपघात
फिरस्तीचे काम असल्याने राजेश पाटील हे सकाळी दुचाकीने पाचोरा येथे जाण्यासाठी निघाले होते. वावडदा गावाजवळील चौफुलीजवळ खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात समोरून येणार्‍या म्हासावद येथील थेपडे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या बसने पाटील यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली.
आधारकार्डावरून पटली ओळख
राजेश पाटील हे अभियंता असल्याने मोटारसायकलीने कामानिमित्त पाचोराकडे जात होते. अपघातातनंतर त्यांच्या खिश्यात मिळून आलेल्या कागदपत्रांसह आधारकार्डावरून त्यांची ओळख पटली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला.
नातेवाईकांचा आक्रोश
घटनेची माहिती कळताच कुटुंबिय, नातेवाईक व मित्र परिवाराने वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात धाव घेवून आक्रोश केला. त्याच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, भाऊ, मुलगी परी, मुलगा यश असा परिवार आहे. दुपारी उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. कापडणे गावी राजेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.