खडसे भाजप सोडण्याच्या तयारीत? म्हणाले…

0

जळगाव  । भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना भाजपने विधान परिषदसाठीच तिकीट नाकारल्याने खडसे तीव्र नाराज असून त्यांनी भाजप सोडण्याचे आता संकेत दिले आहेत. आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचा खुलासा खडसे यांनी केला आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं आहे.

“मला संधी दिली नाही तरी ठीक आहे. पण पक्षात अनेक लोक तिकीट मिळेल या आशेने गेली कित्येक वर्ष निष्ठेने काम करत आहेत. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांना तिकीट देऊ असं आश्वासन दिलं होतं. भाजपाच्या असंख्य कार्यकर्ते, नेत्यांचे मला फोन येत आहेत. तुमच्यावर अन्याय होत आहे, तुम्ही निर्णय घ्या अशी विनंती करत आहेत. काही पक्षही आपल्याकडे यावं यासाठी विचारणा करत आहेत,” असं खडसे यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “पण कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता सध्या असा निर्णय घेणे योग्य राहणार नाही. कोरोनासारख्या गंभीर स्थितीत राजकीय विचार करणं तसंच राजकारणावर चर्चा करणं योग्य ठरणार नाही. आज तशी परिस्थिती नाही. त्यामुळे जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करुन योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल”.

भाजपने विधान परिषद निवडणुकीत ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाकडून डावलण्यात आलं आहे. भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.

Leave A Reply

Your email address will not be published.