खडसेंना क्लिन चीट – कही खुशी कही गम !

0

माजी महसूल मंत्री आणि महाराष्ट्र भाजपातील एक वजनदार नेते एकनाथराव खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लिनचिट दिली. तसा अहवालही न्यायालयात सादर केला. या जमिन खरेदीमुळे शासनाचा कसलाही महसूल बुडालेला नाही. असे एसीबीचे म्हणणे आहे. भोसरी जमिन प्रकरणावरून खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महसूल मंत्री पदाबरोबरच डझनभर खाती नाथाभाऊंकडे देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त खाती त्यांच्याकडे होती. आणि त्या दिड वर्षाच्या कालावधीत यासर्व खात्याची कामे नाथाभाऊंनी कार्यक्षमपणे पार पाडली होती. मंत्री मंडळाच्या बैठकीतही त्यांचा मुख्यमंत्र्यापेक्षाही जास्त दबदबा होता. नाथाभाऊंची निर्णय क्षमता सर्वांना अचबिंत करणारी होती. त्याला ब्रेक लावण्याकरिताच त्यांच्या मागे वेगवेगळे ससेमिरे लावण्यात आले. कुख्यात गुंड दाऊदशी त्यांचे संबंध असल्याच्या आरोपानी खळबळ उडाली. बेहीशेबी मालमत्ता जमविल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या जावयाकडे निमोजीन गाडी नसतांना सुध्दा निमोजीन गाडी खडसेंमुळेच त्यांच्याकडे आहे. अशा आरोप – प्रत्यारोपातून खडसे सहीसलामत सुटले फक्त भोसरी एमआयडीसी जमिन प्रकरणावरून रान उठविले गेले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबईत बेमुदत उपोषणाचे अस्त्र वापरले. परिणामी पक्षाची बदनामी होवू नये म्हणून खडसेंनी 4 जून 2016 रोजी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तब्बल दोन वर्ष खडसे सत्तेबाहेर राहिले. उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रात दबदबा असलेल्या नाथाभाऊंपासून भाजपतील कार्यकर्त्यांचा एक गट त्यांचे पासून दुर गेला. जळगाव जिल्ह्यातही दोन गट पडले. अनेकवेळा नाथाभाऊ समर्थक आणि विरोधकात राडा सुध्दा झाला.
एकनाथराव खडसे मंत्री असतांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे निर्णय घेतले. तसे निर्णय त्यानंतरच्या पालकमंत्र्यांनी घेतलेच नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत जळगाव जिल्ह्याचा विकास ठप्प झाला. तापीवरील पाडळसे धरण, तापीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्प, हतनूर धरणाचा दुसरा कालवा, बोदवड उपसा सिंचन प्रकल्प, कोथळीचे पर्यटन केंद्र, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, कृषी महाविद्यालय, अल्पसंख्याकाचे तत्रनिंकेतन, महापालिका हद्दीतून जाणार्‍या रस्त्यांसाठी घोषित झालेले साडे चारशे कोटीचे कामे यात तसूभरही प्रगती झाली नाही. एकनाथराव खडसे या दोन वर्षाच्या कालावधीत मंत्रीपदावर असते. तर या सर्व विकासकामांत दृष्य प्रगती झाले असल्याचे दिसून आली असती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याचे असतांना आणि ते मुख्यमंत्र्यांच्या अंत्यत जवळचे असतांना यासर्व विकासकामांसाठी काहीही करू शकलेले नाहीत. हे खेदाने म्हणावे लागते. इतकेच नव्हे तर स्वतः महाजन यांनी घोषित केलेल्या गिरणा नदीवरील पाच बलून बंधार्‍यांचे अद्याप काम ही सुरु झालेले नाही. पाडळसरे धरणासाठी केंद्राकडून निधी आणण्यासंदर्भातही त्यांचे एक वाक्यता नाही. वैद्यकिय महाविद्यालयाची घोषणा झाली. परंतु त्याबाबतीत अर्थसंकल्पात तरतुद नसल्याने त्यालाही मुर्त स्वरूप येणे अवघड आहे. जामनेर या त्यांच्या मतदार संघावरच महाजन यांनी लक्ष केंद्रीत केल्याने जिल्ह्याच्या विकासाकडे त्यांनी दुर्लक्षच केले. त्यामुळे जिल्हा विकासाची फार मोठी हानी झाली.
एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचेवर झालेल्या अन्यायामुळे त्यांना मनस्ताप होवू लागला. एक तरी पुरावा द्या मी राजकारणातून निवृत्त होईन असे वेळोवेळी ते म्हणाायचे. या संतापातून पक्ष नेतृत्वावरही आपली नाराजी व्यक्त करू लागले. विविध सभांमधून त्यांनी आपला रोष व्यक्त करू लागले. इतकेच नव्हे तर विधानसभेच्या व्यासपिठावरही त्यांनी आपल्यावर असलेल्या अन्यायासंदर्भात सत्ताधारी पक्षावर रोष व्यक्त केला. विधानसभेतील त्यांच्या या भाषणांना विरोधी पक्षाकडून समर्थन मिळू लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे खडसेंच्या विरोधात वक्तव्य न करता सत्ताधार्‍यांवरच ते आगपाखड करू लागले. सत्ताधार्‍यांकडून सत्ताधारी आमदारावर अन्याय केला जातोय. तेव्हा विरोधकांना सत्ताधार्‍यांकडून न्याय मिळणे शक्य नाही. असा सुर आळवायला लागले. आपल्या पक्षात खडसेंना खेचण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकही संधी सोडली नाही. परंतु खडसेंनी भाजप सोडण्याची भाषा कधीही केली नाही. 20 वर्षापूवी भाजपची जिल्ह्यात कसलीही ताकद नसतांना त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी जीवाचे रान केले. त्या पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी. असे त्यांचे मन मानायला तयार होत नव्हते. इच्छा नसतांना पक्षातुन बाहेर ढकलण्याची माझ्यावर सक्ती केली जातेय. असे ते त्राग्याने म्हणत. मंत्री पद गेल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीत एकनाथराव खडसेंना जो अनुभव आला. तो अनुभव त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी महत्वाचे ठरणार आहे. एकनाथराव खडसेंना मिळालेल्या क्लिनचिटबद्दल त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना आनंद होणे सहाजिकच आहे. तो आनंदोत्सव त्यांनी साजराही केला. त्याच बरोबर भाजपतील त्यांच्या विरोधात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या पोटात मात्र भितीचा गोळा उठला असणार यात शंका नाही. खडसेंच्या मंत्री मंडळातील समावेशाचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्हावासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.