कोल्हापुरात भाजपा हद्दपार ; जिल्हा परिषदही गेली

0

कोल्हापूर : राज्याची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेची सत्ता हातातून गेल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा परिषदही भाजपच्या हातातून गेली आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीने भाजपच्या अडीच वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला. अरुण इंगवले यांना 24 तर बजरंग पाटील यांना 41 मतं मिळाली. कोल्हापूर महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.

दरम्यान, भाजपचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय. पश्चिम महाराष्ट्रातली ही मोठी राजकीय उलथापालथ मानली जातेय. या नव्या समिकरणामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता आज संपुष्टात आली. कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. शिवाय दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. याशिवाय महापालिकेतही काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. केवळ कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. मात्र अडीच वर्षात ती सत्ता सुद्धा हातातून निसटली आहे.

कोल्हापूर झेडपीतील भाजपची सत्ता उलथवून लावण्याचा चंग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडीने एकत्र येऊन बांधला होता. त्यामध्ये त्यांना यश आलं. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून बजरंग पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.

नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला

दरम्याम, नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या बाळासाहेब क्षीरसागर निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सयाजी गायकवाड यांना संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या झंझावातासमोर भाजपने दोन्ही पदांसाठी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.