कोलकात्यात अमित शहांच्या ‘रोड शो’त तुफान राडा

0

कोलकाता  :-  अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्यान मंगळवारी संध्याकाळी मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. भाजप आणि तृणमूल काँग्रसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शो पूर्णत्वास जाऊ शकला नाही. राड्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. रोड शो सुरू असताना एका महाविद्यालयाच्या वसतिगृहातून शहा यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कथित कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तिथे लावण्यात आलेल्या अनेक दुचाकींची त्यावेळी मोडतोड करण्यात आली. त्याशिवाय, अनेक दुचाकी पेटवून देण्यात आल्या.

दरम्यान, तणावाची परिस्थिती असताना अमित शाह यांनी रोड शोला सुरुवात केली. त्यामुळे अधिकच तणाव वाढला. इथे सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले मोदी-शाहांची पोस्टर्स तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हटवली. त्यामुळे टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे दिसून आले. त्यानंतर गोंधळ निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी तातडीने हालचाली करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, शहा 4 किलोमीटर अंतरावर रोड शो करणार होते. मात्र, राडेबाजीमुळे रोड शो पूर्ण पल्ला गाठू शकला नाही. या प्रकाराला तृणमुलचे कार्यकर्ते आणि पोलीस जबाबदार आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान, याला भाजपच जबाबदार असल्याचा प्रतिआरोप तृणमूलकडून करण्यात आला आहे. तणाव असताना रोड शो का काढण्याचा प्रयत्न केला, असा सवालही उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.