मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्यानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची अक्षरश: धावाधाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. विशाखापट्टणमहून निघालेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेस आज राज्यात पोहोचेल. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला मोठं बळ मिळेल.
विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणण्यासाठी कळंबोलीहून एक रेल्वे रवाना झाली होती. या रेल्वेनं परतीचा प्रवास सुरू केला आहे. आज रात्री ती नागपूरला पोहोचेल आणि उद्या सकाळी नाशिकला येईल, अशी माहिती परिवहन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. विशाखापट्टणमहून महाराष्ट्राला रवाना झालेली ही पहिलीच ऑक्सिजन एक्स्प्रेस आहे.
एका एक्स्प्रेसमधून किती ऑक्सिजन मिळणार?
दुसऱ्या लाटेत कोरोनाचा अधिकच उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याशिवाय, कोरोना लसी, रेमडेसिवीर, बेड्सची संख्याही अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ऑक्सिजन ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला. कळंबोली येथून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस काल विशाखापट्टनमला पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार, १०० टनांहून अधिक लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे महाराष्ट्राला करण्यात येणार आहे.
‘राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लान्ट (RINL-VSP) मध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली. प्लान्टमध्ये सात रिकाम्या टँकरमध्ये ऑक्सिजन भरून महाराष्ट्राकडे रवाना करण्यात येणार आहे. सर्व टँकरमध्ये १५ ते २० टन लिक्विड ऑक्सिजन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकाच वेळेस महाराष्ट्राला १०० टनाहून अधिक ऑक्सिजन मिळू शकेल, असे म्हटले जात आहे.