कोरोना विरोधातील काँग्रेसच्या टास्कफोर्समध्ये डॉ. उल्हास पाटलांचा समावेश

0
19

मुंबई :

राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आता काँग्रेसने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी टास्कफोर्स आणि विविध उपसमित्यांची घोषणा केली आहे. त्यासाठी 18 नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याकडे आरोग्य उपसमितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले

राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. यात माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे समन्वयक आहेत. या टास्क फोर्समध्ये खासदार राजीव सातव, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासह18 सदस्य आहेत. तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रिसर्च विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अमोल देशमुख हे टास्क फोर्सचे सचिव आहेत. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आरोग्य उपसमितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले असून माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव ह्या समन्वयक आणि डॉ. मनोज राका सचिव आहेत. ही उपसमिती वैद्यकीय सेवेचे अवलोकन करुन सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना आवश्यक असलेल्या सुविधांसंदर्भात सूचना करेल.


या टास्कफोर्सच्या अंतर्गत विविध उपसमित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यात सामाजिक आणि आर्थिक परिणाम उपसमिती, आरोग्य उपसमिती, शासकीय उपाययोजना अवलोकन उपसमिती आणि माध्यम, सोशल मीडिया आणि मदत कक्ष या उप समित्या कार्यरत असतील.राज्य सरकारला मदत कार्यात सहकार्य करणे, आवश्यकता असेल तेथे सूचना व मार्गदर्शन करणे, काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरु असलेले मदत कार्य गतीमान करणे, काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना कोविड-१९ च्या लढ्यात मदत करणे, त्यांना अधिकाधिक सक्रीय करणे, कोविड-१९ च्या संदर्भाने सरकारच्या उपाययोजना आणि वास्तव परिस्थिती याबाबत सातत्याने माहिती घेऊन साप्ताहिक अहवाल सादर करणे, ऑडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स, वेबिनार आदी माध्यमातून ही टास्क फोर्स कार्यरत राहणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here