नवी दिल्ली : आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरोना लसीसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी म्हणजेच आज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमटीची कोरोना लसीसंदर्भात बैठक होणार आहे.
या बैठकीत तीन कंपन्यांच्या डेटाचे पुनरावलोकन होणार, ज्यांनी इमर्जन्सी यूज ऑथोरायझेशनची परवानगी मागितली आहे. या समितीच्या शिफारशीवर डीसीजीआय निर्णय घेणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायजरने इमर्जन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे.
कोरोना लसीसंदर्भात सर्वात आधी 9 डिसेंबर रोजी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीत आमच्या डेटाबद्दल अजून माहिती देण्यासाठी आम्हाला आणखी काही वेळ हवा आहे, अशी लेखी विनंती फायजरने केली होती. यानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने फायजरला मुदतवाढ दिली होती.
सीरम इन्स्टिट्यूटने जमा केलेला सुरक्षा डेटा 14 नोव्हेंबरपर्यंतचा होता. दीर्घ चर्चेनंतर समितीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे पुनरावलोकनासाठी काही माहिती मागितली. ज्यात क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील अपडेटेड डेटा, त्याचबरोबर ब्रिटन आणि भारतात केलेल्या क्लिनिकल ट्रायलच्या इम्युनोजेनिसिटी डेटा तसेच यूकेच्या नियामकाकडे इमर्जन्सी यूज ऑथोरायजेशनच्या परवानगीची माहितीचा समावेश होता.
दूसरीकडे भारत बायोटेककडेही सर्व माहिती मागितली आहे. सध्या सुरु असलेल्या क्लिनिकल ट्रायलची कार्यक्षमता आणि सुरक्षेची माहिती समितीसमोर सादर करावी, असे भारत बायोटेकला सांगण्यात आले आहे. यानंतर 17 डिसेंबरला पुन्हा एकदा सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली. ज्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडकडून आणखी माहिती मागण्यात आली, जी जमा करण्यात आली.
नंतर 30 डिसेंबर रोजी पुन्हा एका कोरोना लसीबाबत एसईसी म्हणजेच सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, फायजर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक लसीच्या आपत्कालीन वापराबाबत चर्चा झाली. या बैठकीत एसईसीने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून मिळालेल्या अतिरिक्त माहितीवर चर्चा झाली. या बैठकीतही फायजरने आणखी काही वेळ मागितला. कंपन्यांनी जो अतिरिक्त डेटा सोपवला आहे त्याचे पुनरावलोकन केले जात आहे. यावर 1 जानेवारी म्हणजे आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे.