नवी दिल्ली : करोनाला रोखण्यासाठी जगाला लसीची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाकडून या वॅक्सीनविषयी वादग्रस्त विधाने केली जात आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी आम्ही भाजपाच्या वॅक्सीनवर विश्वास ठेवू शकत नाही, असे म्हटले होते तर, त्यापाठोपाठ आता समाजवादी पार्टीचे मिर्झापूरचे विधानपरिषद सदस्य आशुतोष सिन्हा यांनी देखील लसीविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसत आहे.
“कोविड-19 वॅक्सीनमध्ये काहीतरी असं असू शकतं, ज्यामुळे नुकसान होईल. उद्या लोकं म्हणतील वॅक्सीन लोकसंख्या कमी करण्यासाठी/मारण्यासाठी दिलं गेलं आहे. तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता. काहीपण होऊ शकतं.” असं खळबळजनक विधान समाजवादी पार्टीचे मिर्झापूरचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी केलं आहे.
तसेच, अखिलेश यादव यांनी वॅक्सीन संदर्भात केलेल्या विधानाबद्दल आपणास माहिती नाही. परंतु, जर त्यांनी काही म्हटलं असेल तर यामध्ये गंभीरता नक्कीच असेल. असं देखील आशुतोष सिन्हा यांनी सांगितलं आहे. तर, “मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही.” असं अखिलेश यादव यांनी म्हटलेलं आहे.
दरम्यान, केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शनिवारी आणखी एका करोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. ‘कोव्हॅक्सीन’ ही लस ‘भारत बायोटेक’ने देशात विकसित आणि उत्पादित केली आहे.