पुणे : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर, काहींकडून करोनावर लस विकसित करण्याचे प्रयत्न् सुरू आहेत. दरम्यान,कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्तदेखील असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारताच नव्हे तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना परवडणारी अशी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेनं आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आणखी एक पाऊल उचललं आहे.
सीरम इन्स्टिट्युट, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लशीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे. GAVI मार्फत हा निधी सीरम इन्स्टिट्युटला कोरोना लशीच्या उत्पादनासाठी दिला जाईल. सीरम इन्स्टिट्युट 2021 पर्यंत जवळपास 100 दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लशीची किंमत जास्तीत जास्त 3 यूएस डॉलर म्हणजे फक्त 225 रुपये असेल. यासाठी गेट्स फाऊंडेशन सीरम इन्स्टिट्युटने ही माहिती दिली आहे.सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरात सध्या जवळपास 140 कोरोना लशींवर काम सुरू आहे. यापैकी काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. सीरम इन्स्टिट्युटनेही ऑक्सफर्ड-AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसह लशीबाबत करार केला आहे. या लशींचं ट्रायल यशस्वी झालं, त्याला परवानगी मिळाली. तर सीरम इन्स्टिट्युटला या लशीच्या उत्पादनासाठी हा निधी मिळणार आहे.