भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात कोरोना संसर्ग आजाराबाबत नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी साईजीवन शॉप व नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या माध्यमातून शहरात वाहन फिरवून उद्घोषणेव्दारे जनजागृती केली जात आहे. आमदार संजय सावकारेंच्या हस्ते रविवारी दुपारी या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
शहरात कोरोना संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी साईजीवन शॉपच्या माध्यमातून व्हॅनव्दारे उद्घोषणा करुन जनजागृती सुरु केली आहे. आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जगभरात थैमान माजवणारा कोरोना संसर्गजन्य आजार आता आपल्या दारापर्यंत येवून पोचला आहे. या आजाराची नाहक भिती बाळगण्याचे कारण नाही, मात्र गाफिल न राहता खबरदारी तर घेतलीच पाहिजे. यासाठी डोकेदुखी, नाक गळणे, खोकला, घसा खवखवणे, ताप, अस्वस्थ वाटणे, शिंका येणे, धाप लागणे, थकवा जाणवणे, निमोनिया, फुफ्फुसात सूज अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावून वैद्यकिय उपचार घ्यावेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वारंवार हात धुवावे, मास्क किंवा रुमालाचा तोंड झाकण्यासाठी वापर करावा, आदी आवाहन उद्घोषणेव्दारे केले जात आहे. यावेळी आमदार संजय सावकारे, निर्मल कोठारी, प्रमोद सावकारे, गणेश कोळी आदी उपस्थित होते.