मुंबई : महावितरण ही जनतेची कंपनी असून ती वाचविणे व सक्षम करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं सांगत महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक असून त्यासाठी वीजबिलांची थकबाकी असलेल्या सर्वांनी थकबाकी भरा असं आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं. थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत असल्याचे निवेदन नितीन राऊत यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात केले.
विधानसभेत 2 मार्चला झालेल्या चर्चेत महावितरणद्वारे वीज जोडणीबाबत अधिवेशन कालावधीत चर्चेच्या अधीन राहून थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगितीचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने ऊर्जामंत्री राऊत यांनी सभागृहात निवेदन करत वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत असल्याचे निवेदन केलं.
कोव्हिड-19 महामारीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली असून ती सक्षम करणे ग्राहक राजा व आपल्या सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपापल्या कार्य क्षेत्रातील थकबाकीदार ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहित करुन महावितरणला सहकार्य करावे, जेणेकरुन महावितरण ही ग्राहकांना दर्जेदार व अखंड वीज सेवा सक्षमपणे देऊ शकेल, असे आवाहन राऊत यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना केले.
वीजबीले 3 महिन्याच्या सरासरीवर आधारीत
कोव्हिड महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 22 मार्च, 2020 पासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे मार्च 2020 ते जून 2020 या कालावधीत कोविडचे निर्बंध अत्यंत कडकपणे राबविण्यात आल्याने या कालावधीतील वीज देयके महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार मागील 3 महिन्याच्या सरासरीवर आधारीत देण्यात आली. राज्यातील सुमारे 2.50 कोटी घरगुती ग्राहकांपैकी 6 लाख 94 हजार इतक्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 99 टक्के तक्रारींचे समाधानकारक निरसन करण्यात आले.