नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे आज बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
अहमद पटेल यांना 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. 15 नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, शरिरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे आज पहाटे 3.30 वा. त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षांचे होते. अहमद पटेल यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा फैजल यांनी दिली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखून देण्यात आलेल्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन फैजल यांनी जनतेला केलं आहे.
अहमद पटेल यांची यशस्वी राजकीय कारकिर्द
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळापासून अहमद पटेल राजकारणात होते. पटेल आतापर्यंत 8 वेळा खासदार राहिले आहेत. त्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत 5 तर लोकसभेत 3 वेळा त्यांनी काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी गुजरातच्या भरुच जिल्ह्यातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. पटेल यांची ऑगस्ट 2018 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पटेल यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून काँग्रेसमध्ये संघटनात्मक कमान सांभाळण्याचं मोठं काम केलं आहे.