कोरोनाचे लक्षणे दिसल्याने शिक्षकाने मारली तापी नदीत उडी

0

धुळे : कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एका शिक्षकाने तापी नदीत उडी मारुन आयुष्य संपवलं. या शिक्षकाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी दिले होते. मात्र कोरोना झाल्याच्या भीतीतून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती शिक्षकाच्या नातेवाईकांनी दिली आहे.

राजेंद्र भानुदास पाटील असं या शिक्षकाचं नाव आहे. ते शिरपूर इथले रहिवासी होते. लक्षणे दिसल्याने राजेंद्र पाटील यांनी पुढील तपासणीसाठी नमुने दिले होते. तपासणी केली असता त्यांना न्यूमोनिया झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांनी कोरोना झाल्याच्या भीतीतून थेट आत्महत्या केली.

राजेंद्र पाटील यांनी तापी नदीवरील सावळदे फाटा येथून उडी मारून नदीत आत्महत्या केली. कोरोना झाल्याच्या भीतीतून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती राजेंद्र पाटील यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

दरम्यान घटनास्थळी राजेंद्र पाटील यांची दुचाकी तसेच डॉक्टरांची फाईल मिळून आली आहे. या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. तापी नदीत त्यांचा मृतदेह मिळाल्यानंतर, तो शवविच्छेदनासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. राजेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.