मुंबई: देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १ लाख ८४ लाख ३७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे.
गेल्या वर्षी देशात कोरोनाची पहिली लाट आली. त्यावेळी सप्टेंबरच्या मध्यावर कोरोना बाधितांचा आकडा १ लाखाच्या जवळ गेलेला नव्हता. मात्र आता एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सगळेच विक्रम मोडीत काढले. ही लाट केव्हा ओसरणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आपण कोरोना रुग्णवाढीच्या शिखराच्या जवळ पोहोचलो आहोत. पुढच्या आठवड्यात कोरोनाची लाट ओसरू लागेल. दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण कमी होऊ लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.
रेमडेसिविर कधी, केव्हा, कुठे द्यावं?
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोनाबाधितांचे नातेवाईक, कुटुंबीयांची रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सर्वांना अतिशय कळकळीचं आवाहन केलं आहे. ‘रेमडेसिविर जीव वाचवणारं औषध नाही. रेमडेसिविर घेतल्यानं प्राण वाचले असं होत नाही. त्यानं फार फार तर रुग्णाचा रुग्णालयातला कालावधी १ ते २ दिवसांनी कमी होतो,’ असं डॉ. ओक यांनी सांगितलं.
औषध विविध प्रकारची असतं. रेमडेसिविर हे अँटिव्हायरल प्रकारात मोडणारं औषध आहे. जेव्हा एखाद्या व्हायरसची शरीरात वाढ मोठ्या प्रमाणात होते, ती रोखण्याचं काम रेमडेसिविर करतं. मी डॉक्टरांना कळकळीची विनंती करून सांगतो की रेमडेसिविर हे लाईफ सेव्हिंग औषध नाही. रेमडेसिविर दिल्यानं प्राण वाचले असं होत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. शरीरातील ऑक्सिजनची पातळी, व्हिटामिन सी, झिंक, पाण्याचं प्रमाण उत्तम ठेवणं हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. रेमडेसिविर योग्य त्या रुग्णालाच दिलं जावं. ते सरसकट देण्याचं औषध नाही, असं ते पुढे म्हणाले.