नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. रोज कोरोना रुग्णांचे आकडे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत.दरम्यान, देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5.28 लाखाहून अधिक आहे. पण या सगळ्यात, कोरोनाची काही नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली आहेत. त्यामुळे आता एकूण लक्षणांची संख्या बारा झाली आहे. नव्या लक्षणात नाक गळणे, अतिसार, मळमळ यांचा समावेश आहे.
या आधीच्या लक्षणात ताप, अंगाला थंडी वाजून येणे, कफ, श्वास घेण्यात अडचणी, थकवा, स्नायू किंवा अंगदुखी, डोकेदुखी, वास व चव संवेदना जाणे,घसा खवखवणे यांचा समावेश होता. सीडीसीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ही लक्षणेही अजून अपुरी आहेत, ती अद्ययावत करण्याचे काम चालू आहे. जशी करोना रुग्णांची अधिक माहिती मिळेल तशी या लक्षणात भर पडत राहील. ज्या लोकांना कोविड १९ विषाणूचा संसर्ग होतो त्यांच्यात यापैकी काही लक्षणे दिसतात. रुग्णाची स्थिती गंभीर आहे की नाही हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. २-१४ दिवसांत करोनाची लक्षणे दिसतात. त्यात सार्स सीओव्ही २ विषाणू कारण असतो. सुरुवातीला श्वासात अडचणी, ताप व कफ ही तीन लक्षणे देण्यात आली होती नंतर त्यात थंडी वाजणे, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसा धरणे या लक्षणांची भर पडली. एप्रिलमध्ये वास व चव जाणे या लक्षणांचा समावेश करण्यात आला. श्वास घेण्यात अडथळा असा नवा शब्दप्रयोग सीडीसीने आता केला आहे. मधुमेह, फुफ्फुसाचे रोग व हृदयरोगी यांना करोनाचा धोका जास्त असतो. आता करोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या दिशेने असून ४,९९,००० बळी गेले आहेत.