कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागांत २० एप्रिलनंतर उद्योग सुरू होणार ; उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबई । कोरोनाच्या विषाणूचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागांत २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्याचे संकेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. मात्र, कामगारांच्या सुरक्षित वाहतुकीची-राहण्याची व्यवस्था करण्याची अट उद्योजकांवर टाकण्यात येणार आहे. या अटींमध्ये, जे उद्योजक आपल्या कामगारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करतील, अशा उद्योजकांना कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. याचसोबत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे उद्योग नियम पाळतील आणि वाहतुकीची व्यवस्था करतील त्यांना देखील परवानगी मिळेल. एमआयडीसीमध्ये लघुउद्योगांनी एकत्र येऊन कामगारांची राहण्याची सोय केल्यास उद्योग विभाग त्यांना मदत करेल. उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने,  एनआरएचएमचे संचालक एम. अनुपकुमार यादव आदी या बैठकीला उपस्थित होते.

कोरोनामुळे देशभरात लागू केलेला लॉकडाऊन २० एप्रिलपासून काही प्रमाणात शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून परिस्थितीनुसार २१ तारखेच्या आसपास उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्योग विभागाच्या कृतिदलाने याबाबत तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल, असे सुभाष देसाई यांनी सांगितले. साधारणपणे रोजगार गमावलेल्या लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्योग सुरू करण्यामागचा हेतू आहे. हे करताना शेती आधारित उद्योगांना अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

या अटींवर सुरू होऊ शकतात उद्योग

1कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी उद्योगांना चालना.

2 जे उद्योग आपल्या कामगारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या मालकीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करतील.

3 जे उद्योग नियम पाळतील व वाहतुकीची व्यवस्था करतील.

4 एमआयडीसीमध्ये लघुउद्योगांनी एकत्र येऊन कामगारांची राहण्याची सोय करणारे उद्योजक.

 

Leave A Reply

Your email address will not be published.