कोणतीही करवाढ नसलेला चाळीसगाव नगरपालीकेचा अर्थसंकल्प मंजूर

0

चाळीसगाव, दि.25 –
शहरवासियांवर करवाढीचा कुठलाही बोजा न टाकता सुमारे 237 कोटी रूपये शिलकी अंजादपत्रक आज येथील नगरपालीकेच्या सभागृहात सादर करण्यात आला. त्यात 218 कोटी रूपये खर्च तर 19 कोटी रूपये शिल्लक दाखवण्यात आली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सुमारे 1 कोटी 25 लाख रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.नवीन गटारी, नवीन रस्ते, दलीत वस्त्या सुधारणा,अनु.जाती नवबौद्ध घरकुल योजना. नवीन पाणी पुरवठा योजना,भूयारी गटार आदी कामांसाठीही मोठ्या प्रमाणावर तरतुद करण्यात आली आहे. पालीकेला नुकतेच 100वर्षे झाले. या शताब्दी महोत्साच्या समारोपासाठी 1 कोटी रूपयांचीही तरतुद करण्यात आली आहे.
चाळीसगाव नगरपालीकेचा सन 2018-2019 चा सुधारित व सन 2019-2020चा अंदाजित अंदाजपत्रक सादर करण्यासाठी आज नगरपालीकेची सभा आयोजीत करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा आशालता चव्हाण ह्या होत्या तर व्यासपीठावर उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोकर उपस्थित होते.सभागृहात सत्ताधारी गटनेते संजय पाटील यांच्यासह शहर विकास आघाडीचे गटनेते राजीव देशमुख व सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच सुरुवातीला पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांना तसेच पालीकेच्या दिवंगत आजी माजी नगरसेवकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पालीकेच्या सांख्यीकी विभागाचे कुणाल कोष्टी यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले.यावेळी रामचंद्र जाधव यांनी आजच्या अर्थसंकल्पीय टिपण्णीत नगराध्यक्षांची प्रस्तावना जोडली नसल्याचे निदर्शनास आणून दिले.यावेळी सन 2018-19च्या अंदाजपत्रकावर यावेळी गरमामगरम चर्चा झाली. यात अनेक सुधारणा व त्रुटींचा समावेश केला पाहिजे होता तो केला नाही.अपेक्षीत दुरुस्ती न केल्याने याबाबत विरोधकांसह सत्ताधार्‍ंयांनी चर्चा घडवून आणली. यावेळी नगरसेवक चंद्रकांत तायडे यांनी चर्चेत हस्तक्षेप करीत माझ्या प्रभागात अद्यापही एलईडी बल्ब का लावण्यात आला नाही असा सवाल केला तर स्वीकृत नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी नदीच्या पलीकडेही एलईर्डी बल्ब लावणार आहात काय असा खोचक सवाल केला.सुरेश स्वार यांनी बल्ब उरले तर माझ्या प्रभागात लावा अशी कोपरखळी मारली.
यानंतर स्थायी समितीच्या सुचाना काय व कशा पद्धतीने विचारात घेतल्या तसेच हा अर्थसंकल्प नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या सुचना व अपेक्षा समावेश करून तयार केला आहे का असा उपरोधीक सवाल विरोधी गटनेते राजीव देशमुख यांनी विचारला.यावेळी मागील अर्थसंकल्पावरील चर्चा सुमारे दोन तास चालली.चालू वर्षाच्या अर्थसंकल्पाचे वाचन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये अनेकदा खडाजंगी झाली. जेथे गरज नाही तेथे जास्त तरतुद केली आहे तर जेथे गरज आहे तेथे कमी तरतुद केल्याने सत्ताधारी नगरसेवक राजेंद्र चौधरी नाराजी व्यक्त केली.अनेक विषयांवर चर्चा घडून आली. एखाद्या विषयाला चुकीची मंजुरी आमच्याकडून घ्यायची, आम्ही जेलमध्ये जायचे का? असा सवाल चौधरी यांनी करीत अर्थसंकल्प हसण्यावारी नेऊ नका असा सूचक इशाराही त्यांनी दिला.नगरसेवक शेखर देशमुख यांनी अग्निशमन केंद्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर टँकरद्वारे पाणी पालीकेकडून दिले जाते, मात्र त्यात अनियमीतता असून पावत्या कमी दाखवून पाणी जास्त दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला. ही चर्चा वेगळे वळण घेत असल्याचे पाहून नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी विरोधी पक्षांच्या काही सुचना व त्रुटी विचारात घेण्याच्या अनुषंगाने आपण त्या सुचवाव्यात व अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजुरी द्यावी अशी विनंती केली असता सर्व सदस्यांनी होकार देत अंजादपत्रकास मंजुरी दिली.यावेळी नगराध्यक्षा म्हणाल्या की, शहरवासियांना कुठलाही कर न लावता शहराच्या विकासासाठी परिपूर्ण अर्थसंकल्प सभागृहात ठेवला आहे.
..तर पाणी पट्टी वाढणार
पालीकेच्या अर्थसंकल्पात आगामी काळात पाणी पट्टी घरपट्टीत कोणतीही करवाढ झाली नसली तरी सन 2019-20 या आर्थिक वर्षात सुमारे 78, 400,000 रूपये खर्च अपेक्षीत आहे तर उत्पन्न 26,88,000 रूपये अपेक्षीत आहे. त्यामुळे तोटा निर्माण झाल्यास भविष्यात पाणी पट्टीचे दर वाढवून काही अंशी तोटा भरून काढण्याचा मानस अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे.त्याचबरोबर रस्त्यावरील दिवाबत्ती करण्यासाठी होणार्‍या खर्चाच्या पार्श्वभूमीवर काटकसरीचे उपाय अवलंबण्याबरोबरच मालमत्ता करात व विशेष पाणीपट्टीत वेळोवेळी नियमाधीन राहून आवश्यकतेनुसार वाढ आवश्यक आहे. तसेच नवीन मालमत्तांची वेळीच मूल्यानिर्धारण करणे आवश्यक असल्याचेही अर्थंसंकल्पात नमुद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.