मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थीती दिवसेंदिवस बिकट होत चालली असतानाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
राज्यातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज ५० हजारांच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सर्वसामान्य जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, कोणतंही दुखणं अंगावर काढू नका, असा सल्लाही दिला आहे.
‘थोडी जरी लक्षणं आढळली तरी चाचणी करा आणि अहवाल पॉझिटिव्ह आल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपचार करावा. कोणत्याही परिस्थितीत अंगावर दुखणं काढू नये. असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. तसंच, जिल्हाजिल्ह्यातील माझा आभ्यास हेच सांगतोय की उपचार घेण्यास उशीर केल्यानं रुग्ण दगावला. म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की दुखणं आंगावर काढू नका त्वरित कार्यवाही करा,’ असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.