नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर कॉंग्रेसच्या मागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण 2014 आणि 2019 च्या दारूण पराभवानंतर पक्षाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचा पहिला फटका कॉंग्रेससाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसल्याचे पहायला मिळत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात तर गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगारच लटकले आहेत. तसेच अनेक विभागांनाही खर्चात काटकसर करण्याचे आदेश पक्षाने दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेली 60 वर्ष सत्ता भोगल्यानंतर कॉंग्रेस गेल्या पाच वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहे. त्यामुळे पक्षाला मिळणारी आर्थिक रसद जवळपास बंदच झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेसने सोशल मीडिया आणि Data Analyticsसाठी मोठी टीम तयार केली होती. त्यावर प्रचंड खर्च केला होता. मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही उलट या विभागांचे खरे रुप बाहेर आले. राहुल गांधी यांच्यासमोर जे चित्र रंगवण्यात आले होते ते बनावट असल्याची माहिती बाहेर आलीय. त्यामुळे कॉस्ट कटिंगमध्ये पहिला घाव याच विभागांवर पडला आहे. Data Analytics विभाग हा तात्पुरता बंदच करण्यात आला आहे.