डेहराडून – सोमवारी पहाटे ४.३० वाजता लष्करी वाद्याच्या गजरात बद्रीनाथ धामाचे दरवाजे उघडण्यात आले. यानिमित्त मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली. ब्रदीनाथाची महिमा लेजर शोच्या माध्यमातून चित्रित करण्यात आली आहे. बाहेर भक्तांची उसळलेली गर्दी जयजयकाराने आपला आवाज भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती. तथापि, केदारनाथचे दरवाजे रविवारी पहाटेच उघडण्यात आले होते.
भगवान शंकराचार्य आणि भगवान कुबेर यांच्या मूर्ती दरवाजे उघडण्याआधी आर्मी बँडच्या गजरात मंदिरात आणण्यात आल्या. पहिल्याच दिवशी देवाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली. मागच्या दोन दिवसांत हजारो भक्त बाबाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. भगवान बद्रीनाथाचे फक्त निर्वाण दर्शन सोमवारी होतील. या दिवशी भगवंताचा शृंगार केला जात नाही. विशेष पूजाही होत नाही. फक्त संध्याकाळी आरती होते.दुसऱ्या दिवसापासून देवाची दररोज विशेष पूजा केली जाईल.