खेमा झोपे व नितीन चिंचोले या दोघांना प्रत्येक कलमात प्रत्येकी 12 वर्ष सश्रम कारावास
जळगाव :- तब्बल १२० कोटी रुपयांच्या केटामाईन (अंमलीपदार्थ) तस्करी प्रकरणी आज २६ रोजी आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी.ठुबे यांनी सातही आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये सश्रम कारावास व दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची एकूण 27 लाख 50 हजाराची रक्कम राज्य शासनाच्या महसूलात जमा केली जाणार आहे. यातील मास्टरमाईंड संशयित विकास पुरी याला प्रत्येक कलमात 13 वर्ष सश्रम कारावास व पाऊणे दोन लाख असा एकूण २७ लाख दंड तर जळगाव जिल्ह्यातील संशयित खेमा झोपे व नितीन चिंचोले या दोघांना प्रत्येक कलमात प्रत्येकी 12 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. निकालादरम्यान सातही संशयित न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते. निकालानंतर संशयितांना अश्रू अनावर झाले होते.
शहरातीलऔद्योगिक वसाहतीतील रुखमा इंडस्ट्रीज येथे छापा टाकून डीआरआय पथकाने 13 डिसेंबर 2013 रोजी मध्यरात्री छापा टाकून 1175 किलो केटामाइन जप्त केले. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत 118 कोटी रुपये आहे.
याप्रकरणी वरूण कुमार तिवारी, गौरी प्रसाद पाल दोन्ही रा. विकरोली मुंबई, नित्यानंद थेवर (वय 27) रा. धारावी मुंबई, कांतीलाल उत्तम सोनवणे रा. जळगाव, जी. श्रीनिवास राव, विकास पुरी रा. पवई मुंबई, खेमा मधुकर झोपे रा. अंबरनाथ ठाणे, विकास रामकृष्ण चिंचोलो रा. जळगाव, नितीन चिंचोली रा. आदर्श नगर, रजनिश ठाकूर सिकंदराबाद, एस.एम.संथिककुमार मैलापूर, चेन्नई आणि विशाल सोमनाथ पुरी रा. जनकपुरी नवी मुंबई अशा 12 संशयित आरोपींवर नार्कोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्राफिक सबस्टन्स अॅक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल झाला होता. पाच वर्षापासून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे. यात 44 साक्षीदार डीआरआयतर्फे तपासण्यात आले. या खटल्याचा निकाल आज २६ रोजी देण्यात आला.