कॅबीनच्या तक्रारीपेक्षा विकासकामांना प्राधान्य द्या

0

स्थायीच्या सभापतींच्या तक्रारदाराला कानपिचक्या, पीएची कॅबीन पुर्ववत

जळगाव दि. 15-
कॅबीनच्या तक्रारीपेक्षा विकासकामांना प्राधान्य द्या, तक्रार आधी पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांकडे करावयास हवी होती. त्यानंतर आयुक्तांकडे तक्रार करावयास हवी होती. पक्षाचा प्रोटोकॉल पाळायला हवा होता, अशा कानपिचक्या स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे यांनी स्वीय सहाय्यकाच्या कॅबीनबाबत तक्रारकर्त्या स्वकियाला दिल्या आहेत.
महानगरपालिकेचे महापौर व उपमहापौरांच्या स्वीय सहाय्यकांना स्वतंत्र कॅबीन नसताना स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे यांच्या स्वीय सहाय्यकांना स्वतंत्र्य कॅबीन का? तसेच अग्निशमन विभागाच्या कार्यालयावर सभापतींनी अतिक्रमण केल्याची तक्रार एका भाजपा नगरसेवकानेच आयुक्तांकडे केल्याचे समजते. आयुक्तांनी सदर कॅबीन खाली करण्याबाबत आदेश दिले असल्याचे समजल्यावर काल दि.14 रोजी कॅबीनचे स्वीय सहाय्यकांचे कार्यालय हे बोर्ड काढण्यात आले होते. दरम्यान स्थायीचे सभापती जितेंद्र मराठे यांनी आयुक्तांना याबाबत विचारल्यावर असे कुठलेच आदेश त्यांनी दिले नसल्याचा खुलासा केला. अशी माहिती मराठे यांनी पत्रकारांना मंगळवारी दिली.
मला कॅबीनची सवय नाही. अ‍ॅन्टीचेंबर नसल्याने ती सोय केली आहे. गैरसोय होत असेल तर काढून घ्या. टेबल खुर्च्या आणून पोर्चमध्ये बसू. मिळालेला कालावधी हा चांगल्या विकासकामांसाठी खर्च करायचा आहे. मनपाच्या कर्जमुक्तीशिवाय मनपाची वाहने वापरण्यासही श्रेष्ठींची बंदी असल्याचे मराठे म्हणाले. कॅबीनबाबत तक्रार होती. तर पक्षश्रेष्ठींकडे जायला हवे होते. आयुक्तांकडे तक्रारीची गरज नव्हती. तक्रारदार जर संघटनेच्या माध्यमातून गेले असते तर त्यांनी तक्रार केली नसती. त्यांनी प्रोटोकॉल पाळायला हवा होता. कॅबीनचा पोरखेळ केल्याची टीका त्यांनी केली. तसेच आमचा कोणताही कार्यक्रम हा नियोजनबद्ध असल्याचे ते म्हणाले. दरम्यान मंगळवारी स्वीय सहाय्यकांचे कार्यालय बोर्डासह पूर्ववत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.