कृष्ण चरित्र उच्चाराने परमसुखाची प्राप्ती – शारंगधर महाराज मेहूणकर

0

श्रीक्षेत्र मेहूण तापीतीरी मुक्ताई गुप्तदिन सोहळ्याचा समारोप

भुसावळ :- प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही अवतारी पुरुष असल्याने त्यांचे नामस्मरण आपण नेहमी केले पाहिजे. यापैकी प्रभू श्रीराम यांच्या चरित्राचे आचरण तर श्रीकृष्ण यांच्या चरित्राचा उच्चार करायला हवा. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी आयोजित काल्याच्या कीर्तनात श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार केला जातो. कारण श्रीकृष्ण चरित्र उच्चाराने परमसुखाची प्राप्ती होत असल्याचे प्रतिपादन श्रीयज्ञेश्वर आश्रमाचे अध्यक्ष शारंगधर महाराज मेहूणकर यांनी केले.

श्रीक्षेत्र मेहूण येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई गुप्तदिन सोहळ्याच्या सांगता प्रसंगी काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. गवळीयाने ताक पिले या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर चिंतन करून त्यांनी श्रीकृष्णलीलांचे कथन केले. ते आपल्या कीर्तनात म्हणाले की, लौकीक अर्थाने पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे खाद्यपदार्थ एकत्र कालविणे म्हणजे काला होय. गोकुळात श्रीकृष्णाने गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. मात्र अलौकिक अर्थाने जीवशिवाचे ऐक्य म्हणजे काला होय. असा काला जीवनात आनंदाची प्राप्ती करून देत असतो. गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला संचय होय. गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधीत्व करतो. पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहे. भगवंतांची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रेम व भक्तीचा मिलाप व्हायला हवा. गोपाळांकडे असलेल्या नवविधा भक्तीत भगवंताने आपली कृपा कालवून जो काला तयार केला, त्याच्या सेवनाने गोपाळांना परमानंदाची प्राप्ती झाली. स्वर्गीय देवादिकांनाही काला दुर्मिळ आहे. प्रेममय भक्तीतून होणारा काला सेवन करून आनंद मिळवावा किंबहुना सुखाची प्राप्ती करून घ्यावी, असे आवाहनही शारंगधर महाराज मेहूणकर यांनी केले.

संत मुक्ताई यांचा 723 वा गुप्तदिन सोहळा – श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या गुप्त होण्याला 722 वर्ष पूर्ण झाली. यंदा 723 वा गुप्तदिन सोहळा दि. 19 ते 31 मे 2019 दरम्यान पार पडला. त्यानिमित्त सुरेश महाराज व कडू महाराज जंगले यांनी ज्ञानेश्वरी पारायण केले. सप्ताहात विविध कीर्तनकरांची कीर्तने झाली. पंढरपूरसाठी 4 रोजी दिंडी रवाना – दरवर्षाप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र मेहूण ते श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांचा पायी दिंडी पालखी सोहळा पालखीचालक सुधाकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दि. 4 जून रोजी मेहूण तापीतीर येथून रवाना होणार आहे. शेकडो भाविकांच्या सहभागाने ही दिंडी मजल दरमजल करत दि. 9 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल.

Leave A Reply

Your email address will not be published.