कृषी विद्यापीठासाठी युवा सेनेकडून आंदोलनाची भूमिका

0

धुळे/जळगाव :- राहूरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून जळगाव येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथील कार्यक्रमात हे विद्यापीठ स्थापण्यास तत्त्वतः मान्यता दिली. यामुळे धुळेकरांमध्ये नाराजीचा सूर असून मुख्यमंत्र्यांनी परस्पर मान्यतेतून धुळे व जळगाव जिल्ह्यात भांडण लावल्याचा गंभीर आरोपही केला. दरम्यान, कृषी विद्यापीठाबाबत शिवसेना प्रेरित युवा सेनेने आंदोलनाची भूमिका स्वीकारत आज (दि. २५) पासून मंत्री-खासदार-आमदारांच्या घराबाहेर निदर्शने, पुतळादहन करणे, एक दिवस धुळे बंदसह, रास्ता रोको हे महिनाभर सुरू राहणार असल्याचा निर्णय (दि. २४) जिल्हा युवा सेनेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

५० वर्षे जुने कृषी महाविद्यालय
जवळपास ५० वर्षे जुने कृषी महाविद्यालय धुळे जिल्ह्यात असून, राष्ट्रीय महामार्गही उपलब्ध आहे. आमदार एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दर्शवणे म्हणजे सर्व धुळेकरांचा अपमान असून, तो आम्ही सहन करणार नाही, नवीन कृषी विद्यापीठ हे धुळे जिल्ह्यातच झाले पाहिजे. त्यासाठी लढा सुरू राहील, असेही बैठकीत सांगण्यात आले.

युवा सेनेकडून नेत्यांच्या घराबाहेर निदर्शने
सर्वप्रथम आज (दि. २५) संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या घराबाहेर निदर्शने, यानंतर आमदार अनिल गोटे यांच्या घराबाहेर उद्या (दि. २६) निदर्शने करणार येतील. यानंतर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या घराबाहेर शिंदखेडा तालुका युवा सेना बुधवारी (दि. २७) निदर्शने करतील. पुढे नाकर्ते मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांचा मिळून एका पुतळ्याचे दहन करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेनेकडून दिली आहे.

१ मार्चला रास्ता रोको व बंदची घोषणा
तसेच १ मार्च रोजी सकाळी एकाचवेळी रास्ता रोको करण्यात येणार असून दि. २ मार्च रोजी ‘धुळे बंद’ची घोषणा करीत महिनाभर ही आंदोलने सुरू राहणार आहेत. मात्र, दि. २ मार्च रोजी १२ वीचा पेपर व इतर कोणतेही पेपर ज्या शाळा-महाविद्यालयांमध्ये असतील त्यांचा यामध्ये सहभाग नसेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

बैठकीत यांची होती उपस्थिती
बैठकीस अॅड. पंकज गोरे यांनी भूमिका मांडली. सूत्रसंचालन अमित खंडेलवाल यांनी केले. या वेळी युवती जिल्हाप्रमुख ऐश्वर्या अग्रवाल, शहरप्रमुख संदीप मुळीक, हरीश माळी, अंकिता गुजर, राज माळी, जित पाटील, गोकुळ देवरे, मयूर निकम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.