मुंबई । कृषी पंपधारकांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील कृषी पंपधारकांचे 15 हजार कोटींचे वीजबिल माफ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज केली. 42 लाख कृषी पंपधारकांची 42 हजार 160 कोटी थकबाकी आहे. त्यामुळे आम्ही या थकबाकीपैकी 50 टक्के म्हणजे 15 हजार कोटी रुपयांचे वीजबिल माफ करणार आहोत, असं राऊत यांनी सांगितलं.
सरकारने घेतलेल्या या निर्णयांतर्गत कृषी पंपधारकांकडून जी थकबाकी वसूली केली जाईल त्यातील 66 टक्के निधी हा गाव आणि सर्कलच्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. हा निधी वाटप करण्याचा अधिकार राज्याच्या पालकमंत्र्यांना असेल. ग्रामपंचायतीशी सांगड घालूनच हा पायाभूत विकास करण्यात येणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
गेल्या सरकारनं थकबाकीचा डोंगर उभा केलेला आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. लघू दाब, उच्च दाब, सौर यंत्रणेद्वारे वीज जोडण्यांना गती मिळणार आहे. थकबाकीसाठी व्याज आणि दंड माफ करून थकबाकी भरण्याची सवलत देण्यात येईल. कृषी पंपांची थकबाकी 40 हजार कोटीपर्यंत आहे. मार्च 2014 अखेर महावितरणाची थकबाकी 14154 कोटी होती. ही थकबाकी 59148 कोटीपर्यंत गेली आहे. त्याची निश्चित चौकशी केली जाईल. याबाबत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असंही ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे.