मुंबई:
शेतकऱ्यांच्या भव्य लाँग मार्चनंतर त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास राज्यसरकारने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांपुढे कर्ज फेडण्याचे संकट असतानाच कृषिपंपांचे अव्वाचे सव्वा वीजबिल आल्याने बळीराजा धस्तावला होता. त्यातच सरकारने बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडणी सुरू केली होती. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात भीषण दुष्काळ होता. त्यामुळे शेतीला तर सोडाच पिण्याचे पाणी ही उपलब्ध नव्हते. त्यामुळे शेती ओस पडली. कृषिपंप बंदच राहिलेत. वीज वापरलीच नाही तर मग थकबाकी आली कोठून, असा सवालही शेतकरी करत होते. त्यामुळे कृषिपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात होती. विरोधकांनीही याप्रश्नाकडे राज्यसरकारचं वेळोवेळी लक्ष वेधलं होतं. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेऊन अखेर कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती दिली. फडणवीस यांनी विधानसभेत तशी घोषणा करून बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे.