किराणा, भाजीपाला विक्रेत्यांनी घेतला संधीचा फायदा

0

जळगाव | प्रतिनिधी 

संचारबंदीमुळे मंगळवारी किरणा व भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली हाेती. या संधीचा फायदा घेऊन विक्रेत्यांनी दुप्पट किमतीत वस्तू विक्री करून ग्राहकांची लूट केली.
संचारबंदीमुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना काही ठराविक वेळ निश्चित करून दिली आहे. त्यानुसार नागरिक खरेदीसाठी जात हाेते. या वेळी विक्रेत्यांनी ग्राहकांकडून दुप्पट रक्कम घेतली. गणेश कॉलनी, बळीराम पेठेत कांदे ४० रुपये किलो तर बटाटे ५० रुपये किलोने विक्री हाेत हाेते. १५ ते २० रुपये पाव मिळणाऱ्या भाज्या ४० ते ४५ रुपये प्रमाणे विक्री होत असल्याचे चित्र हाेते.
किराणा मालात ३ ते ४ रुपयांनी वाढ
भाजी विक्रेत्यांप्रमाणेच किराणा माल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी परिस्थितीचा फायदा घेत डाळ, शेंगदाणे, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरीच्या दरात किलोमागे ३ ते ४ रुपयांनी वाढ केल्याचे ग्राहकांनी सांगितले.
पाडव्यानिमित्त गोड पदार्थ, दुधाची विक्री
गुढीपाडवा बुधवारी असल्याने शहरात दुग्धालयांवर गर्दी झाली होती. चक्का, श्रीखंड, दूध व मावा आदी वस्तूंना अधिक मागणी होती. काही दुग्धालयांवर सायंकाळी दुधाची कमतरता बघायला मिळाली. कृउबात १३३८ क्विंटल भाजीपाल्याची आवक : संचारबंदीमुळे नागरिकांचे हाल होऊ नये, यासाठी शेतकरी बांधवांतर्फे भाजीपाल्याची आवक करण्यात आली. मंगळवारी १३३८ क्विंटल आवक झाली. दरम्यान, बाजार समितीत शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या मालाला विक्रेत्याकडून कवडीमोल भाव देत आहे; मात्र याच मालाची विक्रेत्यांकडून जादा भावात विक्री केल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.