मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं १ मेपर्यंत संचारबंदीचा निर्णय घेतलाय. यामधून काही घटकांना सूट देण्यात आलीय. संचारबंदी असतानाही किराणा सामान खरेदी करण्याच्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे किराणा दुकाने आता सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनारुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करावी. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा. अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत. त्यांचा शोध घेऊन ती संयंत्रे तातडीने दुरुस्त करावीत. कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सचिवांनी जिल्हा प्रशासन आणि मंत्रालयातील दूवा म्हणून जबाबदारी घ्यावी, असे निर्देशही अजित पवार यांनी दिले आहेत.