एप्रिल महिन्यात महागाईचा दर २.९२ टक्के वाढला
नवी दिल्ली :- केंद्र सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फ किरकोळ महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये एप्रिल महिन्यात महागाईचा दर २.९२ टक्के इतका वाढल्याचं समोर आलं आहे. या महागाईचा हा सहा महिन्यांतील उच्चांक आहे.
देशातील किरकोळ महागाईने गेल्या सहा महिन्यांतील उच्चांक गाठला असून प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे किरकोळ महागाईने नवा स्तर गाठला आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर २.९२ टक्के इतका वाढला आहे. मार्चमध्ये हा दर २. ८६ टक्के होता. यापूर्वी ऑक्टोबर २०१८मध्ये किरकोळ महागाईचा दर ३.३८ टक्क्यांवर पोहोचला होता. फळभाज्या, मांस, मासे, अंडी यांच्या दरवाढीचा थेट परिणाम किरकोळ महागाई वाढण्यात झाला, असे या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे. याशिवाय इंधनदरांत झालेली वाढही किरकोळ महागाईसाठी मारक ठरली. एप्रिलमध्ये इंधनदर २.५६ टक्क्यांनी वाढले. त्यापूर्वीच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये इंधन दरवाढीचे प्रमाण २.५६ टक्के होते.