भुसावळ :-रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात भुसावळ शहर व तालुक्याचे एकूण मतदान ५५ टक्के झाले. शहरातील दोन घटना वगळता मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. यंदा प्रशासनाने केलेल्या जनजागृतीचा सर्वत्र चांगलाच परिणाम दिसून आला. रखरखीत उन्हात सुद्धा मतदांना करिता नागरिक घराबाहेर उत्स्फूर्त पणे निघाले. निवडणुकी पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तगडी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. सकाळी सात वाजेपासून मतदानासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या आणि मतदारांमध्ये वेगळा उत्साह दिसून आला.
नवीन प्रांतअधिकारी कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार महेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल विभागाचे कर्मचारी यांनी काम पाहिले. मतदानासाठी शहरातील खडकारोड, शिवाजीनगर, जाम मोहल्ला भागात मतदारांनी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या.यात प्रामुख्याने महिलांची संख्या अधिक दिसून आली.
५५ टक्के मतदान-दरम्यान सकाळी ११ वाजता २० टक्के, दुपारी १ वाजता ३०.८३ तर दुपारी ३ वाजता ४०.९१ टक्के, सायंकाळी ५ वाजता ४८.९१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. विधानसाभा क्षेत्रात साधारणत: ५५ टक्के मतदान झाले.
सकाळ पासूनच मतदान केंद्रांवर रांगा दिसून येत होत्या.दुपारी १२ वाजेपर्यंत ही स्थिती कायम होती. दुपारी उन्हाचा पारा वाढल्यामुळे मतदानावर काही काळ परिणाम झाला होता. मात्र सायंकाळी पुन्हा तीच स्थिती होती. मात्र ग्रामीण भागात दिवसभर मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या.दिव्यांग मतदारांकरिता रॅम्प सह विविध स्वयंसेवक व प्रशासनाने उत्तम सोया केली तर भुसावळात प क कोटेच्या महाविद्यालयात सखी मतदान केंद्र सर्वांकरिता आकर्षण ठरले. मतदानकेंद्रच्या बाहेर सावलीकरिता मंडप व पाण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह अंगणवाडी महिला कर्मचारी बाळांना सांभाळण्या करिता उपस्थित होत्या.
उत्स्फूर्त प्रतिसाद
या निवडणूकीत प्रचार तोफा पाहिजे तशा धडाडल्या नसल्यातरी मतदारांमध्ये झालेल्या जनजागृती मुळे सर्वच स्थरातून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान प्रशासनातर्फे सर्व कर्मचा-यांना नाश्टा, जेवण, गार पाणी, आदींची उत्तम व्यवस्था सहाय्य्क निडणूक निर्णय अधिकारी डॉ श्रीकुमार चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास पवार, बाळासाहेब ठोंबरे, रामकृष्ण कुंभार, दीपक गांधेले यांचेसह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.