काश्‍मीरप्रश्‍नी संयुक्‍त राष्ट्रात पाक-चीन पडले तोंडघशी !

0

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंदद्वार बैठकीत जम्मू-काश्‍मीर मुद्यावरुन चीन आणि पाकिस्तान यांना अपयश आले आहे. संयुक्त राष्ट्रात भारताला कोंडीत पकडण्याच या दोन्ही देशांचा डाव होता तोच डाव आता फसला आहे. याच मुद्यावरून दोन्ही देशांना अन्य देशांचा पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन काश्‍मीर मुद्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडघशी पडले आहेत. दरम्यान, सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनी काश्‍मीर मुद्यावरुन औपचारीक बैठक घेण्याची पाकिस्तानची मागणी आधीच फेटाळून लावली होती.

बंद खोलीत बैठकीत जम्मू-काश्‍मीरच्या विषयाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा चीन आणि पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. चीनने मागणी केल्यामुळे ही बैठक बोलवण्यात आली होती. सुरक्षा परिषदेतील देशांसमोर चीनने जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यामुळे त्या प्रदेशात तणावपूर्ण परिस्थिती असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अन्य देशांची साथ मिळू शकली नाही. रशियाने भारताला पाठिंबा दिला. रशियाने काश्‍मीरप्रश्नी केवळ द्विपक्षीय चर्चेचे समर्थन केले आहे. पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्रात काश्‍मीर प्रश्नावर चर्चा झाली हा एकप्रकारे आमचा विजय असल्याचा दावा केला. बैठक संपल्यानंतर भारताचे संयुक्त राष्ट्रांतील दूत सईद अकबरुद्दिन यांनी कलम 370 हटवणे हा संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले. काश्‍मीरमधील स्थिती सुरळीत आणि शांत व्हावी हीच आमची इच्छा आहे. काश्‍मीरप्रश्नी झालेल्या सर्व करारांवर आम्ही ठाम आहोत. मात्र काही देश जिहादचा वापर करीत भारतात रक्तपाताला वाव देत आहेत. हिंसाचार हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर होऊ शकत नाही. दहशतवाद थांबवा, मगच आम्ही चर्चेला तयार आहोत असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.