मुंबई : काशी महाकाल एक्स्प्रेसमधील एका सीटला मंदिराचे रुप देण्यात आले आहे, ज्यात भगवान शंकराची मूर्तीही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. ज्या डब्यात हे मंदिर बनवले आहे, त्याचे फोटोही समोर आले आहे. काशी महाकाल एक्स्प्रेसच्या B-5 या डब्यात 64 नंबरची सीट महादेवासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी ते मध्य प्रदेशच्या इंदूरपर्यंत या ट्रेनचा मार्ग असेल. ही रेल्वे इंदूरजवळ ओंकारेश्वर, उज्जैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ या तीन ज्योतिर्लिंगांना जोडणार आहे. भगवान शंकरासाठी B-5 या डब्यात 64 क्रमांकाचे आसन राखीव ठेवण्यात आले आहे, असे उत्तर रेल्वेचे प्रवक्ते दीपक कुमार यांनी सांगितले. विशेष म्हणजे महादेवासाठी सीट राखीव ठेवल्यानंतर ट्रेनमध्ये ‘भोले बाबा’साठी एक सीट कायमची आरक्षित ठेवण्याबाबत रेल्वे प्रशासन विचार करत आहे.दरम्यान भगवान शिवसाठी एक सीट आरक्षित ठेवल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ओवेसी यांनी ट्विटरवर संविधानाच्या प्रस्तावनेचा फोटो पोस्ट करुन पंतप्रधान कार्यलयाला मेंशन करत, काशी महाकाल एक्स्प्रेसमधील महादेवाच्या सीटचे वृत्त रिट्वीट केले आहे.
“महादेवासाठी सीट रिकामी आणि आरक्षित ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सीटवर एक मंदिरही बनवण्यात आले आहे, जेणेकरुन ही सीट मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकालसाठी राखीव आहे, हे प्रवाशांना समजेल,” असे दीपक कुमार म्हणाले. तसेच ही सीट कायमची भगवान शंकरासाठी आरक्षित ठेवण्याचा विचार सुरु असल्याचे दीपक कुमार यांनी सांगितले. वाराणसी ते इंदूर दरम्यान आठवड्यात तीन वेळा धावणाऱ्या या ट्रेनमध्ये भक्तिगीते वाजत राहतील. तसेच प्रत्येक डब्यात दोन खासगी सुरक्षारक्षक असतील. शिवाय प्रत्येक डब्यात सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. तसंच प्रवाशांना शाकाहारी जेवण दिले जाईल. ही ट्रेन 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.