काळ्याबाजारात रेशन धान्याची विक्री; छाप्यानंतर दोघांविरूध्द गुन्हा दाखल

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने धरणगाव  येथील कमल जिनींग मीलमध्ये छापा टाकल्यानंतर दोन दिवसांची पंचनामा करून हा सर्व प्रकार रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ११.६३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

७ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडा रोडवरील कमल जिनींग फॅक्टरीमध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांच्या निर्देशाने पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई विशेष पथकाचे सपोनि सचिन पांडुरंग जाधव, पो.ना. प्रमोद मंडलीक, सहा. फौजदार बशीर गुलाब तडवी यांच्या पथकाने केली. यात रेशनचा अवैध साठा आढळून आला असल्याचे दिसून आले होते. यात रेशनच्या मालात भेसळ करून ते अन्यत्र विक्रीसाठी नेले जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले होते.  याबाबत पूर्ण शहानिशा करण्याचे महसूल प्रशासनाने सूचित केले होते. यानुसार दुसर्‍या दिवशी म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी पुरवठा निरिक्षक संजय घुले यांनी आपल्या सहकार्‍यांसह या धान्याचा पंचनामा केला.

या जिनींग फॅक्टरीत पंचनामा करतांना आढळून आलेले इसम तसेच ट्रक चालकांना विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यात निलेश नामदेव मुसळे (वय ४५, रा. धरीणी चौक, धरणगाव) आणि शेख आमीर शेख बुडन (वय ३२, रा. मलकापुरा, वार्ड नं.२१, दुर्गानगर, ता.मलकापुरा जि.बुलडाणा) या दोघांचा समावेश होता.

यातील निलेश मुसळे यांनी हा धान्यसाठा आपला असून आपण याला इतरत्र विकण्यासाठी शेख आमीर यांना विकला असल्याचे सांगितले. सदर तांदुळ व गहुचा साठा त्याने कुठुन आणला याबाबत त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने सदरचा माल हा ओम ट्रेडर्स, ऐ.बी.रोड सांगवी जि.धुळे व निलेश ट्रेडींग, मराठे लेन, धरणगाव जि. जळगाव या कंपनीकडुन खरेदी केले असुन गोडावुन मध्ये असलेले एफ.सी.आय.चे रिकामे बारदाने हे नागणेशी ट्रेडीगंकपनी, कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव यांच्याकडुन खरेदी केली असल्याचे नमूद केले. तर संबंधीत गोडावुन आपण दिलीप एकनाथ महाले रा.धरणगाव यांच्याकडून भाड्याने घेतल्याची माहिती दिली.

यासाठी सादर केलेला करारनामा हा छाप्याच्या दिवसाचा अर्थात ७ ऑक्टोबर २०२१ चा असल्याचे तपासात दिसून आले. या सर्व बाबींचा विचार करून पोलिस पथकाने गहू आणि तांदूळाचा साठा  वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारा ट्रक जप्त केला. हा संपूर्ण ऐवज १२ लाख ६३ हजार ४३० रूपयांचा असल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात सहायक पोलीस निरिक्षक सचिन पांडुरंग जाधव यांनी धरणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार निलेश नामदेव मुसळे  आणि शेख आमीर शेख बुडन  यांच्या विरुध्द जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.