काळोखात पाप करु नका, काय असेल ते उजेडात करा ; सेनेची मोदी सरकारवर टीका

0

मुंबई :  केंद्र सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविल्यामुळे संतापलेल्या शिवसेनेनं मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.  ‘केंद्रीय गृहमंत्रालयाने भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण म्हणजेच ‘एल्गार’ परिषद गुन्ह्याच्या तपासावर एका रात्रीत ‘झडप’ घालण्याचा प्रयत्न धक्कादायक नाही, तर संशयास्पद आहे. केंद्र सरकारनं  “काळोखात पाप करु नका, काय असेल ते उजेडात करा”, असा टोला ‘सामना’ मुखपत्रातून लगावला आहे.

“महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘रात्रीची’ सेवा बजावली. राजभवनाचा वापर केला, पण तेथेही काही झाले नाही. आता एल्गारप्रकरणी रात्रीच गृहमंत्रालयाने ‘एनआयए’ला महाराष्ट्रात पाठवले. हे लक्षण बरे नाही. रात्रीच्या अंधारात पाय ठेचाळू नयेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने मुंबई रात्री उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळोखात पाप करु नका. काय असेल ते उजेडात करा. समझनेवालों को इशारा काफी है”, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“कोरेगाव-भीमा प्रकरणी विचारवंत, बुद्धिवादी समजणारे काही ‘डाव्या’ विचारसरणीचे लोक पकडले गेले आहेत. ही सर्व मंडळी लेखक, कवी, वक्ते आहेत. ते कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत आणि त्यांच्याच प्रेरणेने भीमा-कोरेगाव प्रकरण घडले. त्यामागे पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचा हात आहे, असे नंतर जाहीर झाले. मात्र एल्गार परिषद आणि नंतर उसळलेली दंगल, हिंसाचार हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत”, असा दावा ‘सामना’ अग्रलेखात करण्यात आला आहे.

“केंद्रात मोदी-शहांचे राज्य नक्कीच आहे, पण महाराष्ट्रासह प्रमुख राज्ये त्यांच्या हातात राहिलेली नाहीत. त्याची वेदना आम्ही समजू शकतो, पण म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप घडवून राज्यांवर दबाव टाकण्याचे तंत्र योग्य नाही”, अशी टीका शिवसेनेने केली आहे. “प्रत्येक राज्याला स्वतःचे अधिकार आणि स्वाभिमान आहे. केंद्राची मनमानी त्यामुळे अस्थिरतेस आमंत्रण देते. ‘एनआयए’ने महाराष्ट्रात झडप घातली. अशी अनेक प्रकरणे भाजपशासित राज्यांत घडत आहेत. तेथे केंद्राचा हस्तक्षेप का नाही?”, असादेखील सवाल शिवसेनेने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.