नवी दिल्ली : भारतात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची एका दिवसातली संख्या लाखांच्या पुढे गेलेली दिसतेय. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात शुक्रवारी २४ तासांत १ लाख ४४ हजार ८२९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ८०० रुग्णांना जीव गमावावा लागला आहे.
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. गर्दी आणि करोना नियमाबद्दलची उदासिनता यामुळे दिवसेंदिवस रुग्णासंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गेल्या २४ तासांतील आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे.
देशभरात गेल्या २४ तासांत तब्बल एक लाख ४५ हजार ३८४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७७ हजार ५६७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. २४ तासांत ७९४ म्हणजेच जवळपास ८०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३२ लाख ५ हजार ९२६ इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी तीनशेच्यावर करोना बळी
राज्यात शुक्रवारीही रुग्णसंख्या वाढीचा आलेख कायम राहिला. दिवसभरात ५८ हजार ९९३ नवीन करोनाबाधित आढळून आले. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे दिवसभरात ३०१ रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर १.७४ टक्के इतका असून, आतापर्यंत राज्यात ५७ हजार ३२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण ५ लाख ३४ हजार ६०३ रूग्ण उपचार घेत आहेत.