कालबाह्य ड्रेनेज पाईपमुळे महापालिकेत दुर्गंधी

0

बदलण्यास निविदेच्या हालचाली सुरु; दैनंदिन स्वच्छतेवरच द्यावा लागणार भर

जळगाव |प्रतिनिधी 

खान्देशात भूषणावह असलेल्या महानगरपालिकेच्या सतरा मजली इमारतीत तळमजल्यापासूनच दुर्गंधी पसरलेली आहे. नेहमीच आकर्षण असलेल्या या इमारतीच्या दुर्गंधीबाबत नागरिकही आता बोलू लागले आहेत.

गेल्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक सदाशिव ढेकळे यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्याबाबत शहर अभियंता सुनिल भोळे यांनी कालबाह्य झालेल्या ड्रेनेज पाईपमुळे दुर्गंधी पसरली असून पाईप बदलणे हाच पर्याय असल्याचे सांगितले होते.

बांधकामापासूनच पाईप जैसे थे

महापालिकेच्या बांधकामावेळी लावण्यात आलेले ड्रेनेज पाईप जैसे थेच आहेत. ते कालबाह्य झालेले आहेत. काही ठिकाणी ते तुटलेले ओलावा व शेवाळे लागलेले आहेत. पाईप सडल्यामुळे लिकेज झालेले आहेत. हे पाईप बदलण्यासाठी लोखंडी शिड्याही लावण्यात आलेल्या होत्या. मात्र दुर्लक्षामुळे त्याही गंजून गेलेल्या आहेत.

चेंबर स्वच्छ ठेवणे हाच उपाय

मनपातील सुटत असलेल्या दुर्गंधीवर सध्यातरी कायमस्वरुपी उपाय नाही. मात्र चेंबर नेहमीच साफ करावे लागणार आहे.

प्रत्येक मजल्यावर होईल तोडफोड

पाईप बदलण्यासाठी प्रत्येक मजल्यावर थेट बाथरुमपासून स्टाईलची तोडफोड करावी लागणार आहे. आऊटलेटचे पाईप स्टाईलखालून गेलेले आहेत. त्यामुळे सर्वत्र तोडफोड होणार आहे. तत्कालीन बांधकामात दीड इंची पाईप वापरले गेले आहेत. ते काढण्यासाठी प्रसाधन गृहांची तोडफोड करावी लागणार आहे.

आज निविदा निघण्याची शक्यता

मनपा अधिकार्‍यांकडून या ड्रेनेजची नुकतीच पाहणी करण्यात आलेली आहे. पाईप बदलण्यासाठी आज सोमवारी निविदा निघण्याची शक्यता आहे. सदरचे काम हे मनपा फंडातून करावे लागणार आहे. मात्र मनपा फंडातून काम करण्यास मक्तेदार नाखुष आहेत.

ट्राली सोडून बदलावे लागतील पाईप

इमारतीच्या 17 व्या मजल्यापासून तर तळमजल्यापर्यंत पाईप टाकण्यात आलेले आहेत. ते बदलण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी  शिड्याही गंजून तुटलेल्या आहेत. पाईप काढण्यासाठी कुठलाही आधारच नाही. त्यामुळे पाईप बदलण्यासाठी थेट 17 व्या मजल्यावरुन ट्रॉली सोडून पाईप बदलावे लागणार आहेत.

दरवाज्यातून दिसते भयावह दृष्य

प्रत्येक मजल्याची धुवून सफाई करुन पाणी बाहेर जाण्यासाठी इमारतीच्या शेजारी लाकडी दरवाजे आहेत. थेट खाली झाडूने पाणी टाकण्याची सोय आहे. सतरावा मजला ते तळमजला पुर्ण खुला असून मध्ये आधार नाही. एखाद्या स्वच्छता कर्मचार्‍याचा तोल गेला तर हाती मासाचे गोळेच येतील अशी भयावह स्थिती या दरवाज्यातून दिसते. ही दारे विनाकुलुप आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.