लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सह्याद्री येथे एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शरद पवार,परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह संबंधित एस.टी. विभागातील अधिकारी, संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये विविध संघटनांनी आपण समाधानी असल्याचं सांगत सर्व शंकांचे निरसन झाल्याचं म्हटलं.
एसटी कृती समितीच्यावतीने बोलताना सांगण्यात आलं की, शरद पवारसाहेब आणि अनिल परब यांच्यात बैठक पार पडली. कृती समितीच्या वतीने आम्ही काही मुद्दे मांडले आहेत पहिल्यांदा दोन महिने संप सुरू आहे. संपाबाबत सविस्तर चर्चा झाली. सातवा वेतन आयोगासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिलंय. कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होतेय. निलंबित व बडतर्फ झालेल्यांना एसटी सुरू झाल्यावर निर्णय घेतला जाईल असं आम्हाला सांगितलंय. बांधवांनो विचार करा, विलिनीकरणाची लढाई कोर्टावर सोपवूया आणि कामावर येवूया असं आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आलं.
एसटी कामगार सेनेच्या कार्यध्यक्षांनी सांगितलं की, सर्व कामगार सेनेच्या सभासदांना आवाहन करतो की, एसटी जगली तर आपण जगणार आहे. आपण सर्वांनी महामंडळाच्या कामावर रुजू व्हावं, एसटी सुरु करावी, आपल्यावर कारवाई होणार नाही याची ग्वाही मिळाली आहे. जर तुम्हाला कोणता त्रास झाला तर आम्ही तुमच्यासाठी हजर राहू.
कृती समितीमधील सदस्य मुकेश तिगोटे म्हणाले की, संपाच्या अनुषंगाने प्रदीर्घ चर्चा बैठकीत झाली. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी या बैठकीत आम्ही मांडली. पगार वाढ झाली होती, त्रुटी असल्या तरी त्यावर विचार करू असे आश्वासन आधी दिलं होतं.पण कर्मचारी संपावर ठाम आहेत. संघटनांशी आमचं काही घेणं देणं नाही असं कर्मचारी म्हणतायत. पण एसटी चालू होतं नाही , तो पर्यंत मार्ग निघणार नाही. न्यायालयीन लढाई करू पण नोकरी वाचवून करू. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजु व्हावं अशी विनंती मुकेश तिगोटे यांनी केली.